बैलाला सोन्याचा भाव; आमगावच्या बाजारात एक लाखावर मिळतेय जोडी (डमी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:45 AM2021-02-23T04:45:43+5:302021-02-23T04:45:43+5:30
गोंदिया : बैलांच्या माध्यमातून पारंपरिक शेती करणे आज जवळपास नाहीच्या बरोबरीत झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतून अधिक ...
गोंदिया : बैलांच्या माध्यमातून पारंपरिक शेती करणे आज जवळपास नाहीच्या बरोबरीत झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतून अधिक उत्पन्न मिळविण्याच्या नादात आज बैलजोडीचा वापर कमी होऊ लागला आहे. छोट्या (अल्पभूधारक) शेतकऱ्यांकडे बैलजोडी आहे. मात्र, मोठे शेतकरी ट्रॅक्टरच्याच मदतीने शेती करतानाचे चित्र जिल्ह्यात आहे. जिल्ह्यात आमगावात सर्वात मोठा बैल बाजार भरतो; परंतु कोरोनामुळे या बैल बाजारावरही संक्रांत आली आहे.
आमगावात मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यांतूनही बैल खरेदी करणारे येत असतात. आमगावच्या बैल बाजारात विक्री करण्यात आलेली बैलजोडी ही एक लाख ५ हजारांत विक्रीला गेली आहे. आमगाव तालुक्याच्या शिवणी येथील आदर्श शेतकरी अशोक बालाराम गायधने यांच्या जोडीलाही १ लाख ५ हजारांत मागणी आली आहे; परंतु त्यांनी त्या जोडीपैकी एका वळूला महाराष्ट्र शासनाचा पहिला एक लाखाचा पुरस्कार मिळाल्याने त्यांनी त्या बैलाला विक्री केले नाही.
बॉक्स
कोट्यवधीची होते उलाढाल
आमगावच्या बैल बाजारातून बैल विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. कोरोनाचा संसर्ग होण्यापूर्वी या बाजारातून एका दिवसाला कोट्यवधीची उलाढाल होत होती; परंतु कारोनामुळे बैल बाजारही १० महिने बंद असल्याने आता बैल बाजारातील उलाढाल कमी झाली आहे. मध्यप्रदेश व छत्तीसगड येथील ग्राहक आता या बाजारात फिरकत नाहीत. केवळ गोंदिया जिल्ह्यापर्यंत हा बाजार आता सीमित झाला आहे.
बॉक्स
बैलजोडीचा दिवसाचा खर्च
एका बैलजोडीला पशू आहार देण्यासाठी कमीत कमी १५० रुपये दिवसाकाठी खर्च येतो. महिन्याकाठी ४ हजार ५०० रुपये खर्च या बैलजोडीचा असल्याने या बैलजोडीचा सांभाळ करणे शेतकऱ्यांना आता शक्य नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपले पशुधन विक्री केले आहे.
बॉक्स
दुधाळ जनावरांची मागणी घटली
१) जनावरांचे पशुखाद्य महागल्याने जनावरांना सांभाळणे कठीण झाले. त्यांच्या चाऱ्याचा प्रश्नच शेतकऱ्यांपुढे ठाकला आहे. मेहनत जास्त असल्याने जनावरांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
२) दुधाळ जनावरांपासून दूध मिळविण्यासाठी त्यांचे पालन केले जात होते; परंतु आता दुधाला किंमत नाही आणि चारा महागल्याने जनावरांचे संगोपन करणे योग्य नाही.
३) दुधाला योग्य किंमत मिळेल यासाठी शासनाचे नियोजन नसल्याने आता उत्पन्न कमी व खर्च अधिक असल्याने कोण जनावरे पाळणार, असा सवाल शेतकरी करीत आहेत.
४) दुधाळ जनावरांना खाद्य नियमित लागते. मात्र, दूध देणे बंद झाले की त्यांचे पालनपोषण करणे याची एकंदरीत गोळाबेरीज केल्यास शेतकरी तोट्यात असतो. त्यामुळे कुणी दुधाळ जनावरे घेत नाही.
......
कोट
जनावरांच्या संगोपनासाठी शेतकऱ्यांना शासनाने भरघोष मदत करणे आवश्यक आहे. त्या मदतीशिवाय जनावरांचे संगोपन करणे शेतकऱ्यांना कठीण आहे. याकडे शासनाने जातीने लक्ष घालावे.
-अशोक गायधने, शेतकरी, शिवणी
.........
जनावरांना लागणाऱ्या चाऱ्याची किंमत मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्या जनावरांचे पोट भरावे की आपले भरावे हा प्रश्न उपिस्थत होत आहे. त्यामुळे आजघडीला जनावरे पाळणे परवडत नाही.
दिलीप महारवाडे, शेतकरी, किडंगीपार
..........
दुधाची किंमत व जनावरांच्या खाद्याची किंमत सरासरी सारखीच असल्याने येणाऱ्या दुधाच्या रकमेतून आहाराव्यतिरिक्त पैसे उरत नाहीत. दुधाला किंमत योग्य मिळत नसल्याने दुधाळ जनावरे पाळणे कठीण आहे.
श्रीराम भांडारकर, शेतकरी, किडंगीपार