दरवाढीने गॅस सिलिंडरची जागा घेतली आता चुलीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 05:00 AM2021-08-19T05:00:00+5:302021-08-19T05:00:12+5:30
गॅस सिलिंडरशिवाय स्वंयपाकघराची कल्पना करताच येत नाही. केंद्र सरकारनेसुध्दा धूर आणि चुलीपासून महिलांना मुक्ती मिळवून देण्यासाठी उज्ज्वला योजनेंतर्गत गोरगरीब कुटुंबांना गॅस संच उपलब्ध करून दिले. सुरुवातीला गॅस सिलिंडरचे दर कमी असल्याने याचा अनेक लाभार्थ्यांनी लाभ घेतला. त्यामुळे ग्रामीण भागात चुलीची जागा गॅस सिलिंडरने घेतली होती. यामुळे वृक्षतोडीलासुध्दा काही प्रमाणात आळा बसला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीपाठोपाठ गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ केली जात असल्याने गृहिणींचे बजेट पूर्णपणे बिघडले आहे. आठ महिन्यांत गॅस सिलिंडरच्या किमती १६५ रुपयांनी वाढल्या आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरचा वापर करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात गॅस सिलिंडरच्या दरवाढीने पुन्हा चुली पेटल्याचे चित्र आहे.
गॅस सिलिंडरशिवाय स्वंयपाकघराची कल्पना करताच येत नाही. केंद्र सरकारनेसुध्दा धूर आणि चुलीपासून महिलांना मुक्ती मिळवून देण्यासाठी उज्ज्वला योजनेंतर्गत गोरगरीब कुटुंबांना गॅस संच उपलब्ध करून दिले. सुरुवातीला गॅस सिलिंडरचे दर कमी असल्याने याचा अनेक लाभार्थ्यांनी लाभ घेतला. त्यामुळे ग्रामीण भागात चुलीची जागा गॅस सिलिंडरने घेतली होती. यामुळे वृक्षतोडीलासुध्दा काही प्रमाणात आळा बसला होता.
मात्र मागील वर्षभरापासून गॅस सिलिंडरच्या किमती सातत्याने वाढत आहेत. ४०० रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर आता ९१० रुपयांवर पोहोचला आहे.
त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या ते आवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळे अनेकांनी गॅस सिलिंडरचा वापर बंद केला असून, पुन्हा चुलीचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. गॅस सिलिंडरच्या दरवाढीने पुन्हा चुली पेटू लागल्याचे चित्र आहे. यामुळे महिलांना चुलीच्या धुरापासून सुटका मिळणे कठीणच दिसत आहे.
एकदा हजार रुपये दर करून टाका
वाढत्या महागाईमुळे आधीच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. कोविडमुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. त्यातच आता केंद्र सरकारकडून गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ केली जात आहे. तर दुसरीकडे अनुदानातसुध्दा मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. गॅस सिलिंडरचे दर ९१० रुपयांवर पोहोचल्याने गृहिणींमध्ये संताप व्यक्त होत असून, एकदाचे गॅस सिलिंडरचे दर एक हजार रुपये करून टाका, अशा शब्दात गृहिणींनी संताप व्यक्त केला आहे.