बैल जोड्यांच्या किमतीत दुपटीने वाढ
By admin | Published: June 12, 2017 01:29 AM2017-06-12T01:29:54+5:302017-06-12T01:29:54+5:30
खरीप हंगामाला आता लवकरच सुरुवात होणार असून मशागतीच्या कामाला वेग आलेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिरचाळबांध : खरीप हंगामाला आता लवकरच सुरुवात होणार असून मशागतीच्या कामाला वेग आलेला आहे. शेतात नांगरणी, शेणखत टाकण्यासाठी बैलांचा उपयोग केला जातो. बैलांच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस शेतीउपयोगी बैलांच्या संख्येत घट होत असल्याने बैल बाजारामध्ये बैलांच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. वाढलेल्या किमतीमुळे सामान्य शेतकरी पैशाअभावी बैलजोडी खरेदी करण्यास असमर्थ ठरत आहे. यामुळे शेतीच्या कामावर परिणाम होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पूर्वी शेतकऱ्यांच्या घरी जनावरे असायची. मात्र आता शेतकऱ्यांकडे जनावरे दिसणे दुरापास्त झाले आहे. दूध देणाऱ्या संकरित गाईचे प्रमाण शेतकऱ्यांकडे वाढले आहे. अधिक नफा मिळविण्याच्या दृष्टिकोनातून दुधाळू जनावरांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जे घरी बैल तयार व्हायचे, ते आता नाहीसे झाल्याने शेतकऱ्यांना बाजारातून बैल घ्यावे लागत आहे.
सध्या जिल्ह्यातील आमगाव, गोरेगाव, काटीनगर व मध्य प्रदेशातील हिर्री आदी बाजारात कमीत कमी दहा हजार रुपयांपासून ५० हजार रुपयांपर्यंत बैल विक्री होत आहे.
या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांकडे पैसा नसल्याने वाढलेल्या किमतीत बैल खरेदी करणे शक्य नसल्याने त्याचा परिणाम शेतकामावर पडत आहे. शेतीचे व्यापारीकरण झाल्यामुळे व सिंचनाच्या सोईमुळे शेतकरी वर्षातून तीनवेळा पीक घेऊ लागला आहे. चराईसाठी जागा नसल्यामुळे जनावर मालकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. या सर्व गोष्टींचा परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांकडील जनावरांच्या संख्येत घट झाली आहे. शेतकऱ्यांना शेतकामासाठी खात्रीलायक बैल मिळत नसल्यामुळे बैल बाजारात बैलांच्या किमतीत दुपटीने वाढ झाले आहे. वाढीव किमतीमुळे नवीन बैलजोडी कशी घ्यावी, अशा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.