जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:30 AM2021-03-16T04:30:14+5:302021-03-16T04:30:14+5:30

इसापूर : कोरोना संक्रमणामुळे देशात व राज्यात आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. मागील वर्षभरापासून अनेकांचा रोजगार हिरावला आहे. कारखान्यात ...

The prices of essential commodities skyrocketed | जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले

जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले

Next

इसापूर : कोरोना संक्रमणामुळे देशात व राज्यात आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. मागील वर्षभरापासून अनेकांचा रोजगार हिरावला आहे. कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची नोकरी गेल्याने त्यांना घरी बसण्याची वेळ आली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून बचत केलेले पैसेसुद्धा शिल्लक राहिले नाहीत.

महिलांनी बचत केलेले पैसे व बँकेत जमा असलेले पैसे काढून दैनंदिन व्यवहार करत आहेत. पण सद्य:स्थितीत बचत केलेले पैसे व बँकेत जमा असलेले पैसेसुद्धा शिल्लक नसल्याने दैनंदिन व्यवहार कसा करावा, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. हाताला रोजगार नाही, गळ्याला गाठी व हाताला माती नाही अशी अवस्था सर्वसामान्य नागरिकांची झाली आहे. शासनाने व लोकप्रतिनिधींनी कोरोना काळात नागरिकांना काम नाही म्हणून तीन महिने रेशन कार्डवर धान्य दिले. तर मागील एक वर्षापासून पेट्रोल व डिझेलवर महिना पंधरा दिवसांत २-२ रुपये वाढ करून पेट्रोलचे दर प्रति लीटर १०० रुपयांवर गेले आहेत. सत्तेत असलेले लोकप्रतिनिधी व विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी स्वयंपाकाच्या गॅसचे दर व डिझेल, पेट्रोलची भाववाढ झाल्याचे सांगत आहेत. मात्र या भाववाढीच्या विरोधात रस्त्यावर उतरण्यास तयार नाहीत. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असून जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे संसाराचा गाडा कसा चालवावा, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

.....

खाद्य तेलाचे दर १६० रुपये प्रति लीटर

दैनंदिन वापरात येणाऱ्या खाद्य तेलाचे भाव नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात ७० रुपये होते. ते भाव आज १६०-१७० रुपये प्रति लीटर झाले आहेत. पूर्वी खाद्य तेलाचे एक टिन १२००-१३०० रुपयांना मिळत होते. त्याला आज २१०० रुपये मोजावे लागत आहेत. वाढत्या महागाईच्या विरोधात बोलण्यास शासन व विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या तोंडून एकही शब्द निघत नाही.

......

गॅस सिलिंडरच्या दराने बिघडले बजेट

कोरोना संक्रमणामुळे मागील एक वर्षापासून केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या दरावर नियंत्रण ठेवणे आवश्यक होते, पण तसे केले नाही. उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत केंद्र सरकारने १०० रुपयांत महिलांना सिलिंडर देऊन स्वत:ची वाहवा करून घेतली. पण गॅस सिलिंडरचे दर ९०० रुपयांवर पोहोचले आहेत. गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने महिला स्वयंपाकासाठी गॅसचा वापर न करता चुलीवर स्वयंपाक करताना दिसत आहेत. तर गृहिणींचे बजेट बिघडले असून खर्चाचा ताळमेळ जुळविताना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Web Title: The prices of essential commodities skyrocketed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.