मारहाणीमुळे मेंदूत मोठी जखमी झाल्याने राजकुमारचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:23 AM2021-05-30T04:23:49+5:302021-05-30T04:23:49+5:30
गोंदिया : आमगाव येथील जिल्हा परिषद शाळेतून चोरीच्या प्रकरणात अडकलेल्या राजकुमार अभयकुमार (वय ३०, रा. कुंभारटोली) याला पोलिसांनी ...
गोंदिया : आमगाव येथील जिल्हा परिषद शाळेतून चोरीच्या प्रकरणात अडकलेल्या राजकुमार अभयकुमार (वय ३०, रा. कुंभारटोली) याला पोलिसांनी बेदम मारहाण करून त्याचा खून केला. त्याच्या डोक्यावर लाकडी दांड्याने जबर मारहाण झाल्यानेच त्याचा मृत्यू झाला आहे. राजकुमारच्या मृतदेहाची उत्तरीय करणाऱ्या डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात राजकुमारच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे मेंदूत रक्त गोठून मत्यूृ झाल्याचे म्हटले आहे.
आमगाव पोलीस ठाण्यात राजकुमार अभयकुमार याला पट्टा व लाकडी दांड्याने मारहाण झाल्याचे सीआयडीच्या तपासात पुढे आले आहे. राजकुमारच्या डाव्या कानाच्या व डाव्या डोळ्याच्या वर १३ सें.मी. गुणीला ६ सें.मी. एवढी जखम आहे. पाठीमागे छोट्या मेंदूजवळ १२ सें.मी. लांब व ६ सें.मी. रुंद, अशी जखम आहे. मारहाणीमुळे डोक्यात सूज आली व मेंदूत रक्त गोठले. त्यामुळे राजकुमारचा मृत्यू झाला आहे. उत्तरीय तपासणीत डॉक्टरांनी राजकुमारच्या शरीरावरील जखमा मोजून काढल्या असता त्याच्या शरीरावर २७ जखमा होत्या. इन्क्वेस्ट पंचनाम्यात राजकुमारच्या डाव्या गालाच्या वरच्या बाजूला मुका मार होता. डाव्या हाताच्या टोंगळ्यावर जुनी जखम, डाव्या हाताच्या खांद्याच्या खालच्या बाजूला मुका मार आहे. डाव्या हाताच्या मनगटावर हाताचा खालचा भाग सुजलेला होता. उजव्या हाताच्या मनगटावर मुका मार होता. उजव्या कंबरेच्या बाजूला काळ्या रंगाचे जन्मजात निशाण, तसेच दोन्ही पाय व गुडघ्यावर सूज होती. उजव्या पायाच्या गुडघ्याला खरचटलेले, जखमा लालसर-निळसर व दोन्ही तळपाय सुजलेले होते. उजव्या पायाला तळपायाच्या वरच्या बाजूला घोट्याला खरचटलेले होते. पाठीचा भाग लालसर रंगाचा दिसत होता. उजव्या पायाच्या टोंगळ्याच्या मागच्या बाजूला मुका मार व सुज होती. डाव्या पायाच्या मागच्या बाजूला मुका मार व सूज होती. उजव्या कानाच्या पाठीमागच्या बाजूला सूज होती. मानेवर सूज, उजव्या हाताच्या कोनीला सूज व मुका मार होता. डाव्या हाताच्या कोनीवर सूज व मुका मार असल्याचे सीआयडीने इन्क्वेस्ट पंचनाम्यात म्हटले आहे.
..........................................
लॉकअपमधून बाहेर काढल्याच्या नोंदीच घेतल्या नाहीत
एखाद्या प्रकरणातील अटक आरोपीची चौकशी करायची असल्यास लाॅकअपमधून आरोपीला बाहेर काढून चौकशी करायची असल्यास तशी नोंद ठाणेदाराला स्टेशन डायरीला घ्यावी लागते; परंतु आमगाव पोलिसांनी राजकुमारला लॉकअपच्या बाहेर काढल्या बाबतच्या कोणत्याही नोंदी स्टेशन डायरीत घेतल्या नाहीत.