फ्रंटलाइन लसीकरणात खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:37 AM2021-02-25T04:37:05+5:302021-02-25T04:37:05+5:30

अर्जुनी मोरगाव : कोरोनाच्या जागतिक महामारीत प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना फ्रंटलाइन लसीकरणात वगळल्याने आश्चर्य व्यक्त ...

Private medical professionals were excluded from the frontline vaccination | फ्रंटलाइन लसीकरणात खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना वगळले

फ्रंटलाइन लसीकरणात खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना वगळले

googlenewsNext

अर्जुनी मोरगाव : कोरोनाच्या जागतिक महामारीत प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना फ्रंटलाइन लसीकरणात वगळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. निमा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी जिल्ह्यातील तहसीलदारांना निवेदन देऊन यावर संताप व्यक्त केला.

मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचे संक्रमण सुरू झाले. विविध आस्थापना बंद झाल्या. त्या काळात आपला जीव धोक्यात घालून कोरोना जागतिक महामारीच्या साथीत शासकीय व खासगी रुग्णसेवा सुरूच होती. आरोग्य विभाग व प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करून त्यांनी सहकार्य केले. या काळात ताप, सर्दी व खोकला असलेल्या रुग्णांची नावे आरोग्य विभागाला कळवून रुग्णांशी त्यांनी वेळोवेळी वैरत्वसुद्धा पत्करले. जेव्हा कोविडची सुरुवात झाली, त्यावेळी खासगी नर्सिंग होमच्या चालकांनी कार्य बंद केले होते. अशाही परिस्थितीत जनरल प्रॅक्टिशनर लोकांनी जीव धोक्यात घालून रुग्णसेवा केली होती. शासनाच्या आरोग्य विभागाने फ्रंटलाइन कोविडयोद्धयांची यादी तयार केली. त्यावेळी स्थानिक वा जिल्हापातळीवर आरोग्य प्रशासनाने त्यांच्याशी साधे समन्वय साधण्याचेही सौजन्य बाळगले नाही. मागील महिन्यात शासनाने कोरोना लसीकरण मोहीम सुरू केली. यात ग्रामीण व तालुका पातळीवरील प्रायव्हेट प्रॅक्टिशनरांचा समावेश नाही. सध्या आरोग्य क्षेत्राशी निगडित नसलेल्या लोकांचे लसीकरण होत आहे. मात्र, खासगी डॉक्टरांना अद्याप स्थान देण्यात आले नाही. खासगी डॉक्टरांना हेतुपुरस्सर डावलण्याचा हा आरोग्य यंत्रणेचा डाव असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोग्य प्रशासनाकडे ही खंत व्यक्त केल्यानंतरसुद्धा मौखिक सूचना व चौकशीला प्रतिसाद दिला जात नसल्याची व्यथा खासगी डॉक्टरांनी बोलून दाखवली. तालुका वैद्यकीय संघटनेच्या शिष्टमंडळात डॉ. महेश नाकाडे, डॉ. वैशाली गाडेगोणे, डॉ. जागेश्वर गायकवाड, डॉ. शेंडे, डॉ. आरती शेंडे, डॉ. ज्ञानेश्वर कापगते, डॉ. रमेश कापगते, डॉ. सुनीता कापगते, डॉ. अनिल झोडे, डॉ. दीपक रहेले, डॉ. नरेंद्र भांडारकर, डॉ. दामोदर शहारे, डॉ. अमित शहारे, डॉ. कैलाश गाडेकर, डॉ. योगेश गाडेकर, डॉ. मेघा गाडेकर, डॉ. तरुण मंडल, डॉ. चित्तरंजन नाकाडे आदींचा समावेश होता.

.....

आरोग्य विभागाकडून आमच्यावर अन्याय

आरोग्य प्रशासनाकडून हा आमच्यावर एकप्रकारे अन्याय आहे, याबद्दल डॉक्टरांनी संताप व्यक्त केला. खासगी डॉक्टर हे फ्रंटलाइन कोविड-१९ वॉरिअर या बिरुदावलीत मोडत नाही का, असा प्रश्न उपस्थित करून डॉक्टरांनी बुधवारी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांना निवेदन दिले. याची रीतसर आरोग्यमंत्र्यांना तक्रार करण्यात येईल, अशी माहिती निमा असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ. उल्हास गाडेगोणे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

......

कोरोना महामारीत प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना फ्रंटलाइन लसीकरणात वगळल्याचे आश्चर्य आहे. खासगी डॉक्टर हे फ्रंटलाइन कोविड-१९ वॉरिअर या बिरुदावलीत मोडत नाही का.

- डाॅ. घनश्याम तुरकर

Web Title: Private medical professionals were excluded from the frontline vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.