निकालातही खासगी शाळा वरचढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:08 AM2018-07-12T00:08:46+5:302018-07-12T00:10:08+5:30
महिनाभरापूर्वीच दहावीचा निकाल जाहीर झाला. यात कित्येक खाजगी शाळांनी १०० टक्के निकाल दिला. मात्र नगर परिषदेच्या एकाही शाळेचा निकाल शंभर टक्के लागला नाही. नगर परिषद व शासनाकडून या शाळांवर लाखो रुपयांचा खर्च केला जात आहे.
कपिल केकत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महिनाभरापूर्वीच दहावीचा निकाल जाहीर झाला. यात कित्येक खाजगी शाळांनी १०० टक्के निकाल दिला. मात्र नगर परिषदेच्या एकाही शाळेचा निकाल शंभर टक्के लागला नाही. नगर परिषद व शासनाकडून या शाळांवर लाखो रुपयांचा खर्च केला जात आहे. मात्र यानंतरही शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढत नसल्याने या खर्चावर सुध्दा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.
दहावीच्या परीक्षेत एकेवेळी बोर्डाचे टॉपर देणारी शाळा म्हणून नगर परिषदेची म्युनिसिपल हायस्कूल ओळखले जात होते. कालांतराने मात्र नगर परिषदेच्या या शाळांचा दर्जा खालावत चालला आहे. १०० टक्के तर सोडाच मात्र ९० टक्केच्यावर निकाल देण्यात या शाळा असमर्थ ठरत आहे. त्यामुळे पालकांचा कल आता खाजगी शाळांकडे वाढला असून नगर परिषदेच्या शाळांमध्ये आपल्या पाल्यांना टाकण्यास इच्छुक नाहीत. खाजगी शाळांतील नाममात्र पगारावर काम करणारे शिक्षक त्यांच्या शाळेचा निकाल १०० टक्के देत आहेत. तर उलट गलेलठ्ठ पगार घेऊनही पालिकेच्या शाळांतील शिक्षक मात्र अपयशी ठरत आहेत. अशात खाजगी शाळांमधील कमी पगारावर काम करणारे शिक्षक जास्त गुणवंत असल्याचे बोलले जात आहे. शासन व पालिकेकडून शाळांवर लाखो रूपयांचा खर्च करीत आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना अन्य सुविधा दिल्या जात आहेत. पण यानंतरही नगर परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा खालावत चालला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांची स्थिती नगर परिषदेच्या शाळांसारखीच होती. जिद्द व चिकाटीमुळे आता जिल्हा परिषदेच्या शाळा खाजगी शाळांना टक्कर देत आहेत. मात्र नगर परिषदेच्या शाळांची स्थिती आहे तीच आहे. पटसंख्या बोटावर मोजण्या इतकी असून तेवढ्या विद्यार्थ्यांकडूनही पाहिजे तसा निकाल देण्यास शिक्षक अपयशी ठरत आहे. अशात भविष्यात नगर परिषदेच्या शाळांचा वाली कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुलींनी मारली बाजी
नगर परिषदेच्या पाच माध्यमिक शाळा शहरात आहेत. यात येथील एस.एस.गर्ल्स शाळेने सर्वाधीक ८८ टक्के निकाल देऊन बाजी मारली आहे. म्युनिसीपल हायर हायस्कूलने ८३ टक्के निकाल दिला आहे. म्युनिसिपल लोअर हायस्कूलचा ८२ टक्के तर रामनगर म्युनिसीपल शाळेचा ६२ टक्के निकाल आहे. माताटोली शाळेचा ५० टक्के निकाल लागल्याची माहिती आहे. कधी बोर्डाचे टॉपर देणारी म्युनिसिपल हायर हायस्कूल मात्र आता निकालांत माघारली आहे.
बोटावर मोजण्याएवढे विद्यार्थी
नगर परिषद शाळांतील निकालाची ही स्थिती बघता शाळांत शिक्षणाची काय गत आहे हे दिसून येते. त्यामुळे पटसंख्येची स्थिती ही यापासून वेगळी नाही. यातून पालिकेच्या शाळांची स्थिती किती गंभीर आहे याची प्रचिती येते. पालिकेच्या या स्थितीला नगर परिषद प्रशासन व पदाधिकारीही तेवढेच जबाबदार आहेत. त्यांनी दम लावल्यास नगर परिषद शाळांना गतवैभव लाभणार यात शंका नाही.