भटक्या समाजाची समस्या संपता संपेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:27 AM2021-03-21T04:27:41+5:302021-03-21T04:27:41+5:30
कार्यालयातून तक्रारपेट्या गायब सालेकसा : शासकीय-निमशासकीय कार्यालयातील कामकाज आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेक तक्रारी असतात. तक्रारी निराकरण करण्यासाठी वरिष्ठांकडे जाणार ...
कार्यालयातून तक्रारपेट्या गायब
सालेकसा : शासकीय-निमशासकीय कार्यालयातील कामकाज आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेक तक्रारी असतात. तक्रारी निराकरण करण्यासाठी वरिष्ठांकडे जाणार या हेतूने शासकीय कार्यालयात तक्रारपेट्या लटकविलेल्या दिसायच्या. मात्र आता या तक्रारपेट्या गायब झाल्या आहेत. संबंधितांची तक्रार कुठे करावी, असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे.
रासायनिक खतांचा अतिवापर धोकादायक
देवरी : चांगले पीक घेण्यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा वापर करीत आहेत. परंतु अलीकडे या खतांचा अतिवापर होत आहे. त्यामुळे त्याचा मानवी जीवनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, रासायनिक खतांमुळे पोषक तत्त्व नष्ट होत असून पिकांनासुद्धा नुकसान होते.
रोजगार सेवकांना मानधन अत्यल्प
गोरेगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी झटणारे रोजगार सेवक संकटात आहेत. लोकांच्या हाताला काम द्यावे म्हणून मनरेगांतर्गत काम उपलब्ध करून देण्यात त्यांची जबाबदारी आहे. मनरेगा कामाची जबाबदारी पार पाडणाऱ्या रोजगार सेवकांच्या मानधनात वाढ करावी.
जिल्ह्यातील वनसंपदा आली धोक्यात
अर्जुनी-मोरगाव : नागझिरा अभयारण्य व वनपविभाग परिसरात कोट्यवधी रुपयांची वनसंपदेची तस्करी केली जात असल्याचे नागरिकांमधून ओरड होत आहे. शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. याकडे संबंधित विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.
विकासाची घडी विस्कटली
केशोरी : गावचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायतीला उत्पन्नाचे स्रोत असलेले प्रमुख माध्यम मालमत्ता, पाणी व दिवाबत्ती कर जमा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, मार्च महिन्यापासून आजपर्यंत नऊ महिन्यांचा कालावधी संपला असून, कराची रक्कम ग्रामपंचायतीला कोरोनाच्या प्रभावामुळे वसूल करता आली नाही. त्यामुळे गावविकासाची घडी विस्कटल्याचे चित्र आहे.
बाजारातील रस्ते मोकळे करा
गोंदिया : बाजारपेठेतील रस्ते अगोदरच अरुंद आहेत. त्यातही दुकानदार त्यांच्या दुकानातील सामान व बोर्ड्स रस्त्यावर आणून ठेवतात.
सडक योजनेच्या रस्त्याची दुरवस्था
तिरोडा : तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत रस्त्याची निर्मिती व डांबरीकरणाचे काम करण्यात आले. परंतु यापैकी अनेक रस्त्यांची अल्पावधीतच दुरवस्था झाली आहे. यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तंटामुक्त गाव अभियान नावापुरतेच
सडक-अर्जुनी : राज्य शासनाच्या तंटामुक्ती गाव अभियान योजनेला गावागावातील राजकीय गटबाजी आणि अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांमुळे ग्रहण लागल्याने या अभिनव योजनेचा फज्जा उडाला आहे.
रिफ्लेक्टरअभावी अपघातांत वाढ
देवरी : वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याने होत असलेल्या अपघाताची संख्या लक्षणीय आहे. एकूण अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात हे केवळ मानवी चुकांमुळे होत असल्याचे दिसते.
निराधार लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेतले
आमगाव : कोरोनामुळे घराबाहेर पडू शकत नसलेल्या वृद्ध व दिव्यांगांना विशेष सहाय योजनेचा लाभ मिळवून देता यावा यासाठी ‘गृहभेट आपुलकीची’ ही संकल्पना अंमलात आणली जात आहे.
प्रसाधनगृहाअभावी व्यापाऱ्यांची कुचंबणा
गोंदिया : व्यापारी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या मोठ्या बाजारात प्रसाधनगृहाची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे ग्राहक, व्यापाऱ्यांची मोठी कुचंबणा होत आहे.
घोगरा ते देव्हाडा रस्त्यांची दुरवस्था
मुंडीकोटा : जवळील ग्राम घोगरा ते देव्हाडा रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, या रस्त्याने पायी चालणेही कठीण झाले आहे. हा रस्ता अपघाताला आमंत्रण ठरत आहे.घोगरा ते देव्हाडा या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले दिसत आहेत. गिट्टी व मुरूम उखडून बाहेर रस्त्याच्या कडेला पडलेला आहे. हा रस्ता पूर्णपणे जीर्ण अवस्थेत दिसत आहे.
पथदिवे दिवसभर सुरूच
केशोरी : येथून जवळ असलेल्या ग्राम बोंडगाव (सुरबन) ग्रामपंचायत अंतर्गत गावातील पथदिवे ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे दिवसभर सुरूच राहतात. पथदिव्यांचे वीजबिल ग्रामपंचायत भरत असली तरी घरकराची वसुली करताना त्यामध्ये दिवाबत्ती कर नागरिकांकडून वसूल केला जातो. विनाकारण दिवसाच्या विजेचा अधिक भाराचा भुर्दंड का सहन करायचा, असा सवाल नागरिकांनी केला आहे.