कोरोनामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:28 AM2021-05-23T04:28:21+5:302021-05-23T04:28:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क केशोरी : गेल्या एक वर्षापासून कोरोना महामारीने डोके वर काढले आहे. या महामारीच्या वाढणाऱ्या संसर्गाला आळा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
केशोरी : गेल्या एक वर्षापासून कोरोना महामारीने डोके वर काढले आहे. या महामारीच्या वाढणाऱ्या संसर्गाला आळा घालण्यासाठी वेळोवेळी होत असलेल्या लॉकडाऊनमुळे मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबप्रमुखांना आता पोट भरण्याची चिंता सतावू लागली आहे तर दुसरीकडे कोरोना महामारीची चिंता या द्विधा परिस्थितीमुळे जीवन जगणे कठीण झाल्याची खंत मजुरी करणाऱ्या कुटुंबप्रमुखांनी व्यक्त केली आहे.
कोरोना महामारीने परिसरात रौद्ररुप धारण केल्यापासून तालुका प्रशासनाने लॉकडाऊन घोषित करुन ये-जा करण्यावर कडक निर्बंध लावले आहेत. छोटे-मोठे उद्योगधंदे बंद असल्याने त्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मार्च महिन्यापासून लग्नसराईला सुरुवात होते. या लग्नसराईमुळे गावातील छोटी-मोठी दुकाने भरभराटीला येतात. परंतु, यावर्षी कोरोना महामारीच्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे व्यवसाय पूर्णत: बुडाले. त्यामुळे या व्यवसायावर दैनंदिन मोलमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या कुटुंबप्रमुखांची रोजीरोटी हिरावली गेली व त्यांच्यावर उपासमारीचे संकट आले. एकीकडे पोट भरण्याची चिंता तर दुसरीकडे कोरोना महामारीची भीती यामुळे गोरगरीब कुटुंब आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.