अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या समस्या निकाली काढणार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:30 AM2021-04-02T04:30:50+5:302021-04-02T04:30:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बोंडगावदेवी : तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे प्रश्न व समस्या निकाली काढण्याकरिता ३१ मार्च ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे प्रश्न व समस्या निकाली काढण्याकरिता ३१ मार्च रोजी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने बालविकास प्रकल्प अधिकारी प्रियंका किरणापुरे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी किरणापुरे यांनी सर्व समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले.
कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या १२ फेब्रुवारीला झालेल्या बैठकीमध्ये मृतक स्नेहलता गोपाल लाडे (सेवानिवृत्त अंगणवाडी मदतनीस) यांची एकरकमी पेन्शन त्यांच्या वारसदारांना मिळण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. तसेच मार्च २०२१चे मानधन १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपूर्वी करण्यात यावे, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवा ज्येष्ठतेनुसार दर पाच वर्षांनी मानधन वाढ देण्यात यावी, अंगणवाडी सेविकांची प्रलंबित प्रवास भत्ता देयके तातडीने काढण्यात यावी, अंगणवाडी सेविकांची मासिक सभा बीट स्तरावर घेण्यात यावी, अंगणवाडी केंद्रावर विद्युत मीटर उपलब्ध करण्यासंदर्भात संबंधित विभागाला पत्रव्यवहार करण्यात यावा, सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची एकरकमी पेन्शन संदर्भात तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अंगणवाडी केंद्रात नळ योजनेद्वारे छतावर पाण्याची टाकी उपलब्ध करुन देण्यात यावी, आदी मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी या सर्व समस्या प्राधान्याने निकाली काढण्याचे आश्वासन बालविकास प्रकल्प अधिकारी किरणापुरे यांनी दिले. यावेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे गोंदिया जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक, जिल्हा संघटिका शिवा वासनिक, सदस्य पुष्पा उईके व सदस्य उपस्थित होते.