रूग्ण व मजुरांनी मांडल्या समस्या
By admin | Published: May 21, 2017 01:57 AM2017-05-21T01:57:25+5:302017-05-21T01:57:25+5:30
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या निमंत्रित सदस्य एस.जलजा या गुरूवारी १८ मे रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या.
रूग्णांशी साधला संवाद : एस. जलजा यांची एकोडी पीएचसीला भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या निमंत्रित सदस्य एस.जलजा या गुरूवारी १८ मे रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या. या वेळी त्यांनी गोंदिया तालुक्यातील एकोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी उपस्थित आरोग्य अधिकारी, कर्मचारी, नागरिक व रुग्णांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमोर विविध समस्या मांडण्यात आल्या.
प्राथमिक आरेग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांची किती पदे आहेत व रिक्त पदांची माहिती जाणून घेतली. वैद्यकीय अधिकारी डॉ. सिरसाठ यांनी माहिती देताना सांगितले, पुरूष व स्त्री रूग्णांसाठी स्वंतत्र वार्ड आहे. आंतररूग्ण सुविधा आहे. मलेरीया, क्षयरोग व बाळंतपणासाठी रूग्ण येथे येतात. रूग्णालयाला नवीन रूग्णवाहिकेची आवश्यकता असून पाण्याची सुविधा नसल्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह रूग्ण व नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपलब्ध राहत नाही. पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. वार्डांची व स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता केली जात नसल्याची माहिती नागरिकांनी जलजा यांना दिली. जलजा यांनी रूग्णालयातील महिला व पुरूष वार्ड, शस्त्रक्रीया कक्ष, औषधसाठा कक्ष, निर्जंतुकीकरण कक्ष, प्रयोगशाळा कक्ष, आरोग्य सहायिका कक्ष व स्वच्छता गृहाची पाहणी केली.
आरोग्य सेविकांनी नियमित अंगणवाडीत भेट देवून बालकांचा वाढदर्शक तक्ता नियमित पहावा व त्यानुसार त्यांना आहार देण्याचे सांगून नियमित उपचार करावे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रूग्ण कल्याण समितीच्या निधीतून आवश्यक ते वैद्यकीय साहित्य खरेदी करावे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, नवीन रूग्णवाहिका तसेच अधिकारी कर्मचारी यांच्या शासकीय निवासस्थानांची दुरूस्ती करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची देखभाल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या घराप्रमाणे करावी. बाळंतपणासाठी येणाऱ्या महिलांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे त्यांनी सांगितले.
रोहयो कामाची पाहणी व मजुरांशी संवाद
एस.जलजा यांनी गोंदिया तालुक्यातील धामनेवाडा ग्रामपंचायत अंतर्गत सुरु असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या नाला सबलीकरणाच्या कामाला भेट देवून पाहणी केली व उपस्थित मजुरांशी संवाद साधला. नाला खोलीकरणाचे काम ५०० मीटरचे असून यावर २७२ मजूर काम करीत असल्याची माहिती ग्रामसेवक पी.एस. बिसेन यांनी दिली. मजुरांशी संवाद साधताना जलजा यांनी आपण या कामावर किती ते कितीवाजतापर्यंत काम करता याची विचारणा केली. यावेळी उपस्थित महिलांनी सकाळी ९ ते सांयकाळी ५ या वेळात काम करीत असल्याचे सांगितले. यावर जलजा म्हणाल्या, ही कामाची वेळ बदलून पहाटे ६ वाजता ते सकाळी ११ आणि दुपारी ४ ते ६ यावेळेत काम करावे, म्हणजे उन्हापासून बचाव करता येईल, असे सांगितले. त्यांनी मजुरीची माहितीसुद्धा विचारली. यावर जवळपास १५० ते १७५ रु पये प्रतिदिन मजुरी पडत असल्याचे महिलांनी सांगितले. हा पैसा आमच्या खात्यात थेट जमा होतो. परंतु मागील दोन आठवड्यांपासून कामाचा पैसा जमा झाला नसल्याचे मजूर गुजुबा भोयर व सदाराम बावनकर यांनी सांगितले. मजुरीतील मिळणाऱ्या पैशाचा योग्य विनियोग करावा व आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी या पैशाचा उपयोग करावा व व्यसनापासून दूर राहावे, असे जलजा यांनी सांगितले. रोजगारसेवक गिरीधारी तिडके यांच्याकडूनही रोहयोच्या कामाची माहिती जाणून घेतली.