उपोषणाच्या धसक्याने कर्जवाटप प्रक्रिया सुरू
By admin | Published: June 10, 2016 01:53 AM2016-06-10T01:53:09+5:302016-06-10T01:53:09+5:30
गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अर्जुनी मोरगांव तालुक्यातील शेतकऱ्यांना २४ एप्रिलपासून खरीप पीक कर्ज वाटप प्रक्रिया बंद ...
समस्या शेतकऱ्यांची : कर्ज वसुली २४ कोटी तर कर्ज वाटप केवळ ११ कोटीच
अर्जुनी मोरगांव: गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अर्जुनी मोरगांव तालुक्यातील शेतकऱ्यांना २४ एप्रिलपासून खरीप पीक कर्ज वाटप प्रक्रिया बंद केल्याचा निषेधार्थ बँकेचे संचालक केवळराम पुस्तोळे यांच्या नेतृत्वात मंगळवार (दि.७) अर्जुनी मोरगांव तालुक्यातील सर्व विविध कार्यकारी संस्थांचे अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांनी मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अर्जुनी मोरगांव शाखेसमोर उपोषण सुरू केले होते. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिवेदी यांनी लगेच उपोषण मंडपाला भेट देवून उपोषणकर्त्यांसोबत चर्चा केली. तसेच कर्ज वाटप प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने लगेच उपोषण मागे घेण्यात आले.
गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही पूर्णत: शेतकरी हिताची आहे. शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप हे बँकेचे मुख्य उद्देश्य आहे. जिल्ह्यात सर्व सहकारी बँकांपैकी अर्जुनी मोरगांव येथील शाखा सर्वच बाबतीत आघाडीवर आहे. यावर्षी अर्जुनी मोरगांव तालुक्यातील पीक कर्जाची वसुली २४ कोटी झाली आहे. परंतु कर्ज वाटप फक्त ११ कोटी केलेले आहे. जिल्ह्याच्या इतर तालुक्यातील वसूली कमी असून कर्ज वाटप ८० ते १०० टक्के केले आहे. मात्र सर्वच बाबतीत अग्रसेर असलेल्या अर्जुनी मोरगांव तालुक्यावर पीक कर्ज वाटपात अन्याय झाला, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. या अन्यायाच्या निषेधात बँकेचे संचालक केवळरात पुस्तोळे यांनी पुढाकार घेवून तालुक्यातील सर्व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष व पदाधिकारी यांना घेवून पीक कर्ज वाटप पुन्हा सुरू करावे, अशी मागणी घेवून बँकेच्या शाखेसमोर उपोषण सुरू केले. या उपोषणाची दखल घेत गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिवेदी यांनी लगेच उपोषण मंडपाला भेट दिली. तसेच उपोषणकर्त्यांच्या मागण्या मंजूर करून कर्ज वाटप प्रक्रिया त्वरित सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
या संदर्भात उपोषणकर्त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कर्ज वाटप सुरू करण्यासंदर्भात १ जून रोजीच उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार जिल्हा बँकेने २ जून रोजी उपोषणकर्त्यांना पत्र लिहून पीक कर्ज वाटप सुरू करण्यात येईल, असे लेखी कळविले होते. उपोषण मंडपात त्रिवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सन २०१६-१७ करिता पीक कर्ज वाटपासाठी नाबार्डकडे राज्य सहकारी बँकेमार्फत १० लाख रुपये एस.टी.एस.ए.ओ. अंतर्गत फेर कर्ज मर्यादेची मागणी केली आहे. परंतु अजूनपर्यंत कर्ज मर्यादा मंजूर झालेली नाही.
साधारणता मे महिन्यामध्ये सदर मर्यादा मंजूर होत असते. बँकेने ३१ मे २०१६ पावेतो जिल्ह्यात ५६१०.५९ लाख रुपये पीक कर्ज वाटप केलेले आहे. सदर वाटप हे बँकेने स्वनिधितून केलेले आहे. रिझर्व्हे बँकेचे बँकींग रेग्युलेशन अॅक्ट १९४९ चे कलम १८ व २४ अनुसार बँकेला सीआरआर व एसआरएल हा दररोज कायद्यानुसार ठेवणे आवश्यक आहे. दुसरी बाब म्हणजे जिल्हा परिषदेने गोंदिया जिल्हा बँकेतून ८५००.०० लक्ष रुपये ठेवी माहे मे २०१६ मध्ये काढून घेतल्याने निधीच्या कमतरतेमुळे पीक कर्ज वाटपात बाधा निर्माण झाली, असे जिल्हा बँकेचे म्हणने आहे. अन्यथा शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप सुरळीत असते.
या आंदोलनाची दखल घेत अर्जुनी मोरगाव तालुक्यात पीक कर्ज वाटप सुरू करण्यात येत आहे, असे लेखी आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिवेदी यांनी दिले. तसेच जे मोठे शेतकरी आहेत व ज्यांना जास्त प्रमाणात कर्ज वाटप पाहिजे त्यांना टप्पाटप्यात कर्ज वाटप करणार असल्याचेही सांगितले. तसेच ज्या शेतकऱ्यांनी कर्ज प्रकरणे विविध कार्यकारी सोसायटीच्या गटसचिवाकडे सादर केले, ते सर्व कर्ज प्रकरणे त्वरित बँकेत जमा करून मंजूर करण्यास सांगितले. अखेर सर्व मागण्या मंजूर झाल्याने उपोषण समाप्त करण्यात आले.
या वेळी बँकेचे संचालक केवलराम पुस्तोडे, बाजार समितीचे सभापती काशीराम जमाकुरेशी, रघुनाथ लांजेवार, लायकराम भेंडारकर, प्रदीप मस्के, अर्जुनी मोरगांव सह.बँकेचे शाखा व्यवस्थापक मेश्राम, तालुक्यातील सर्व विविध कार्यकारी संस्थाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. आभार बाजार समितीचे उपसभापती भेंडारकर यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)