विक्रमी १३ कोटी २५ लाख मत्स्यजीऱ्यांचे उत्पादन

By admin | Published: August 9, 2016 01:01 AM2016-08-09T01:01:08+5:302016-08-09T01:01:08+5:30

तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदियात पूर्वजांनी सिंचनासाठी माजी मालगुजारी तलाव बांधले.

Production of record 13.15 million fish species | विक्रमी १३ कोटी २५ लाख मत्स्यजीऱ्यांचे उत्पादन

विक्रमी १३ कोटी २५ लाख मत्स्यजीऱ्यांचे उत्पादन

Next

मामा तलावात मत्स्यशेती : ढिवर व आदिवासी बांधवांकडून विदेशी तंत्रज्ञानाचा वापर
गोंदिया : तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदियात पूर्वजांनी सिंचनासाठी माजी मालगुजारी तलाव बांधले. हे तलाव आजही सिंचनासोबत मत्स्य शेतीसाठी उपयुक्त ठरले आहे. जिल्ह्यातील ढिवर व आदिवासी बांधव मत्स्य सहकारी संस्थांच्या माध्यमातून या तलावात मत्स्यशेती करीत आहेत. या गोड्या पाण्यातून कतला, रोहू, मृगळ आणि सायिप्रनस या जातींच्या माशांचे उत्पादन घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे यावर्षी विदेशी तंत्रज्ञानाची मदत घेत मत्स्यजीऱ्यांचे विक्रमी उत्पादन घेण्यात आले आहे.
इटियाडोह प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या मत्स्यबीज केंद्रातील चायनीज हॅचरीतून या हंगामात १ कोटी ९४ लाख तर इतर ११ मत्स्य सहकारी संस्थांच्या तलावातून १२ कोटी ३१ लाख मत्स्यजीऱ्यांचे उत्पादन घेण्यात आले आहे. जिल्ह्याबाहेर व जिल्ह्यातील मत्स्य सहकारी संस्थांसोबतच खाजगीरित्या मत्स्य शेती करणाऱ्यांना इटियाडोह मत्स्यबीज केंद्र व मत्स्य सहकारी संस्थांकडून मत्स्यजीऱ्यांची विक्री करण्यात येत आहे. मत्स्यजीरे, मत्स्यबीज उत्पादन, बोटुकली ते मत्स्योत्पादनातून जिल्ह्याची निलक्रांतीकडे वाटचाल सुरु आहे.
गोंदिया जिल्ह्यात १३३ मत्स्य सहकारी संस्थांची नोंदणी आहे. त्यापैकी १२४ संस्था कार्यरत आहे. या संस्थांचे जवळपास ११ हजार सक्रिय सभासद मासेमारीचा व्यवसाय करीत आहेत. ही मासेमारी पाटबंधारे विभागाच्या ६५ आणि जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या १०८७ तलावात्ांून करण्यात येत आहे.
अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील गोठणगावजवळील इटियाडोह मत्स्यबीज केंद्राची स्थापना १९७५ मध्ये करण्यात आली. हे केंद्र १९७८-७९ मध्ये कार्यान्वित झाले. यामध्ये संगोपण तळी ३३, संवर्धन तळी १० आणि संचयन तळी ४ अशी एकूण ४८ तळी आहेत. येथील चायनीज हॅचरीतून मत्स्यजीऱ्यांचे उत्पादन घेण्यात येते. या केंद्रातील शुध्द मत्स्यजीरे, मत्स्यबीजांची व बोटुकलींची विविध मत्स्य सहकारी संस्थांना विक्र ी करण्यात येते. १ लाख मत्स्यजीेरे १५० रु पये अशा शासन दराने विक्र ी करण्यात येते. इटियाडोह मत्स्यबीज केंद्रातून यावर्षी १ लक्ष ७२ हजार रुपये महसूल प्राप्त झाला आहे.
जिल्ह्यातील ११ संस्थांनी शुष्क, ओलीत व मोगरा पध्दतीच्या बांधातून १२ कोटी ३१ लक्ष मत्स्यजीऱ्यांचे उत्पादन घेतले. मोगरा बांध पध्दतीतून कोसमतोंडी (सडक/अर्जुनी), भानपूर (गोंदिया), नवेगावबांध, माहुरकुडा, सोमलपूर व ताडगाव (अर्जुनी/मोर.), ओलीत बांध पध्दतीतून गिरोला (सडक/अर्जुनी) चान्ना/बाक्टी, माहुली खोडशिवणी (अर्जुनी/मोरगाव) तर शुष्कबांध पध्दतीतून खोडशिवणी, गिरोला, माहुली, चान्ना/बाक्टी येथील मत्स्य सहकारी संस्था मत्स्यजीऱ्यांचे उत्पादन घेतात. या संस्था आपली गरज पूर्ण करून इतर संस्थांना तसेच खाजगी मत्स्य शेतकऱ्यांना मत्स्यजीऱ्यांची विक्र ी करतात.
मासेमार ढिवर समाजबांधव हे पारंपारीक पध्दतीने माशांपासून मत्स्यजीरे तयार करतात. मोगरा, शुष्क व ओलीत बांध पध्दतीने मत्स्यजीऱ्यांचे उत्पादन घेतात. मत्स्यजीरे निर्मितीसाठी मोगरा बांध पध्दतीचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. मोगरा पध्दतीच्या बांधामध्ये तलावाच्या काठावर टाक्यासारखा मातीचा बांध तयार करु न त्यामध्ये पाणी सोडून नर आणि मादी माशांना इंजेक्शनमधून संप्रेरक देवून उत्तेजीत केले जाते. नर व मादीच्या मिलनानंतर मादी मासे आपल्या पोटातील अंडी या बांधमध्ये सोडतात. नंतर ही मत्स्यअंडी एकत्र करु न तलावात तयार करण्यात आलेल्या वाफ्यामध्ये सोडण्यात येतात. ७२ तासानंतर अंड्यांचे मत्स्यजीऱ्यात रु पांतर होते. (शहर प्रतिनिधी)

जिल्हाधिकाऱ्यांची संकल्पना
४ इटियाडोह मत्स्यबीज केंद्रातून १ कोटी ९४ लक्ष मत्स्यजीरे.
४ संस्थांच्या तलावातून १२ कोटी ३१ लक्ष मत्स्यजीऱ्यांचे उत्पादन.
४ उत्पादनासाठी चायनीज हॅचरी, शुष्क, मोगरा व ओलीत बांधाचा वापर.

४मत्स्य उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून पथदर्शी प्रकल्प म्हणून १५ तलावात मत्स्यबीज संगोपन व संवर्धनासाठी तळी बनविण्यात येत आहे. या तळीचा उपयोग मत्स्यजीरे व मत्स्यबीज वाढविण्यासाठी होणार आहे. त्यामुळे या संस्थांच्या मत्स्य उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. सोबतच त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार असून जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांकही वाढविण्यास मत्स्योत्पादनातून मदत मिळणार आहे.

चिनी तंत्रज्ञानातून हॅचरीज
४गोठणगाव जवळील मत्स्य व्यवसाय विभागाच्या मत्स्यबीज केंद्रामध्ये चीनच्या तंत्रज्ञानातून तयार करण्यात आलेल्या चायनीज वर्तुळाकार हॅचरीतून मत्स्यजीऱ्यांची निर्मिती करण्यात येते. सारख्याच वजनाच्या नर आणि मादी माशांना इंजेक्शनमधून संप्रेरक देवून उत्तेजित केले जाते. नर व मादी माशांच्या मिलनातून मादी या उत्तेजनातून पोटातील अंडी पाण्यात सोडतात. त्यानंतर या अंड्यातून जीऱ्याच्या आकाराची माशांची पिलं बाहेर पडतात. त्यामुळे त्यांना मत्स्यजीरे म्हटले जाते. नंतर चायनीज हॅचरीतून एकत्र केलेले मत्स्यजीरे संवर्धन व संगोपन तळीत सोडली जातात. या मत्स्यजीऱांची मत्स्यबीज किंवा बोटुकलीपर्यंत म्हणजे बोटाच्या आकाराची होईपर्यंत संवर्धन व संगोपन तळीत वाढविली जातात. त्यानंतर त्यांना तलावात सोडण्यात येते.

Web Title: Production of record 13.15 million fish species

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.