धानाचे उत्पादन यंदा २० टक्क्यांनी घटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:48 AM2018-10-18T00:48:33+5:302018-10-18T00:49:25+5:30
धान निसविण्याच्या कालावधीतच पावसाने पाठ फिरविल्याने आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला. परिणामी धानाच्या प्रती हेक्टरी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : धान निसविण्याच्या कालावधीतच पावसाने पाठ फिरविल्याने आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला. परिणामी धानाच्या प्रती हेक्टरी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार एकूण उत्पादनात २० टक्के घट होण्याची शक्यता असून याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी मागील दोन तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. मात्र यंदा हवामान विभागाने सुरूवातीपासूनच चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज सुरूवातीला काही प्रमाणात ठरला. पिकांसाठी अनुकुल वातावरण असल्याने वाढ सुद्धा चांगली झाली.
मात्र आता धान निघण्याच्या स्थितीत असताना मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने धानपिके संकटात आली आहे. तर ढगाळ वातावरणामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात किडरोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.
महागड्या कीटकनाशकांची फवारणी करुन सुद्धा कीडरोगांचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकरी हैराण असल्याचे चित्र आहे. यावर्षी धानाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता होती. मात्र पावसाने पाठ फिरविल्याने शेतकºयांना हाती आलेली पिके गमाविण्याची पाळी आली आहे.
यंदा जिल्ह्यात दोन लाख हेक्टरवर धान पिकांची लागवड करण्यात आली आहे. त्यात जवळपास ५० हजार हेक्टरला सिंचनाची सोय आहे. बहुतेक शेतकरी सिंचन प्रकल्पातील पाण्याच्या मदतीने पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे.
मात्र काही शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नसल्याने त्यांना नैसर्गिक पावसावरच अवलंबून राहावे लागत आहे.
धान निसविण्याच्या कालावधीत पाऊस झाल्यास धान चांगला भरतो व उत्पादनात वाढ होते.
मात्र नेमक्या याच कालावधी पाऊस बेपत्ता झाल्याने उत्पादनात २० टक्के घट होण्याची शक्यता असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.
भारनियमनाची भर
आधीच पावसाने पाठ फिरविल्याने धानपिके संकटात आली आहे. त्यामुळे मोटारपंप लावून धरणे, विहिरी, तलावांच्या मदतीने शेतीला सिंचन करीत होते. मात्र मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात आठ ते दहा तासांचे भारनियमन केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. आधीच शेतकऱ्यांवर निसर्ग कोपला असताना त्यात भारनियमनाची भर पडली आहे.
किडरोग आणि पावसामुळे धानाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. पीक कापणी प्रयोगानंतर उत्पादनात नेमकी किती टक्के घट होईल हे निश्चित सांगता येईल.
- भाऊसाहेब बºहाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया.