वारकऱ्यांसह लालपरीलाही पंढरीच्या वारीची बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:19 AM2021-07-19T04:19:19+5:302021-07-19T04:19:19+5:30
गोंदिया : कोरोनाच्या ग्रहणामुळे विठूरायाच्या आषाढी एकादशीच्या पंढरपूरच्या वारीवर बंदी आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी वारकऱ्यांना आषाढी एकादशीत आपल्या ...
गोंदिया : कोरोनाच्या ग्रहणामुळे विठूरायाच्या आषाढी एकादशीच्या पंढरपूरच्या वारीवर बंदी आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी वारकऱ्यांना आषाढी एकादशीत आपल्या विठूमाउलीच्या दर्शनापासून वंचित राहावे लागणार आहे. तर येथील आगारातून दरवर्षी येथील काही मोजक्याच भाविकांसाठी तसेच प्रामुख्याने त्या भागातील आगारांच्या मदतीसाठी पाठविल्या जाणाऱ्या ३-४ बसेसवरही बंदी आली आहे. यामुळे आता येथून जाणाऱ्या काही वारकऱ्यांसह एसटीलाही वारीतील खंड पडणार आहे.
--------------------------
दरवर्षी पंढरपूरसाठी किती बसेस सोडल्या जायच्या - ३-४
त्यातून किती उत्पन्न मिळायचे - सुमारे ५००००
एसटीतून दरवर्षी साधारण किती जण प्रवास करायचे- १५-२०
-------------------
जिल्ह्यातून दरवर्षी जाणाऱ्या पालख्या
जिल्हा राज्याच्या शेवटच्या टोकावर वसला असून येथून पंढरपूरचे अंतर हजारो किलोमीटरचे आहे. त्यामुळे येथून नियमितपणे पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या भाविकांची संख्या नगण्य आहे. काही मोजके भाविक असतील तरीही ते नित्यनेमाने पंढरीच्या वारीला जाणारे नसावेत. त्यात आता कोरोनामुळे परिस्थिती नियंत्रणात नसल्याने वारीवरच बंदी आहे. पूर्वीही येथून पालखी जात नव्हती.
------------------------------
पंढरीच्या वारीसाठी एकही पालखी नाही
जिल्ह्यात विठूरायाच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे येथून पालखी जातच नाही. पंढरपूरची यात्रा बघण्यासाठी काही भाविक जात असल्यास त्यांचीही संख्या कमीच आहे. यामुळे येथून पंढरीच्या वारीसाठी पालखी जाणार नाही.
--------------------------
कोट
येथून पंढरपूरला वारीसाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या अत्यंत कमीच आहे. त्यातही पंढरपूरपर्यंत थेट जाणारे नाहीच. त्यामुळे गाड्यांची सोय करूनही त्यातून काहीच प्रवासी जात होते. शिवाय जिल्ह्यातून एकही पालखी जात नाही. आता कोरोनामुळे बंदी असल्याने येथून जाणाऱ्या बसेसही जाणार नाहीत.
- यू.एन. उईके
वाहतूक निरीक्षक, गोंदिया आगार
---------------------------
वारकऱ्यांचेही गावी मन रमेना !
आतापर्यंत विठूमाउलीच्या वारीत हजेरी लावली. यासाठी काही प्रवास पायी तर काही प्रवास रेल्वेने करायचो. मात्र आता शरीर साथ देत नसून मागील वर्षीपासून कोरोनामुळे वारीवर बंद आली आहे. त्यामुळे आमच्या वारीलाही खंड पडला.
- तुळशीराम हुकरे, पदमपूर
-------------------------
आषाढी एकादशीच्या वारीला जाऊन विठूमाउलीचे दर्शन घेत होतो. यासाठी पायी व रेल्वेने प्रवास करीत होतो. मात्र वयोमानानुसार आता वारी जमत नसून त्यातही मागील वर्षापासून वारीवर बंदी आली आहे. त्यामुळे वारीला खंड पडला असून आता येथूनच माउलीला हात जोडतो.
- चंद्रभागा पाथोडे, रिसामा