...तर विमानतळाच्या प्रवेशद्वारासमोर घरे बांधू, प्रकल्पग्रस्तांची आक्रमक भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2022 02:34 PM2022-03-22T14:34:24+5:302022-03-22T14:53:35+5:30

प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी बिरसी विमानतळाच्या प्रवेशद्वारासमोरील जागेत घर बांधण्यासाठी मार्किंग करून आंदोलन केले. यामुळे काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती

Project victims staged a protest in front of gondia Birsi Airport on 21 march | ...तर विमानतळाच्या प्रवेशद्वारासमोर घरे बांधू, प्रकल्पग्रस्तांची आक्रमक भूमिका

...तर विमानतळाच्या प्रवेशद्वारासमोर घरे बांधू, प्रकल्पग्रस्तांची आक्रमक भूमिका

Next
ठळक मुद्दे१५ वर्षांपासून प्रशासनाचे दुर्लक्ष

खातिया : गोंदिया तालुक्यातील बिरसी येथील प्रकल्पग्रस्तांचे बिरसी विमानतळ प्राधिकरण आणि प्रशासनाने अद्यापही पुनर्वसन केले नाही. त्यामुळे १०६ कुटुंबीयांना उघड्यावर जीवन जगावे लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी (दि.२१) बिरसी विमानतळाच्या प्रवेशद्वारासमोर कुदळ, फावडे घेऊन व घर बांधकामाचे मार्किंग करून आंदोलन केले.

बिरसी विमानतळामुळे प्रकल्पग्रस्त झालेले १०६ कुटुंब मागील पंधरा वर्षांपासून पुनर्वसनाची वाट पाहत आहेत. यासाठी त्यांनी अनेकदा जिल्हा प्रशासन व बिरसी विमानतळ प्राधिकरणाला अनेकदा निवेदन दिले. आपल्या समस्याही मांडल्या; परंतु प्रशासनाने केवळ पोकळ आश्वासने देत वेळ मारुन नेली; पण अद्यापही पुनर्वसन केले नाही. परिणामी, या १०६ कुटुंबांना तयार केलेल्या मातींच्या घरांमध्ये तात्पुरते वास्तव्य करीत आहे; पण या घरांची स्थितीसुद्धा आता बिकट झाली असून, ते केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तर दुसरीकडे या प्रकल्पग्रस्तांना शासनाने घरे बांधण्यासाठी प्लाॅट उपलब्ध करून दिले नाही. तर ते कधी उपलब्ध करून देणार, याबाबत कुठलेच आश्वासन दिले नाही. त्यामुळे अजून किती दिवस असे जीवन जगायचे, असा सवाल करीत प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी बिरसी विमानतळासमोर आंदोलन केले, तसेच विमानतळाच्या प्रवेशद्वारासमोरील जागेत घर बांधण्यासाठी मार्किंग करून आंदोलन केले. यामुळे काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

विमान सेवा सुरू केली, आता आम्हाला जमीन केव्हा देणार?

बिरसी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी खा. सुनील मेंढे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. यानंतर ती सेवासुद्धा सुरू झाली आहे; पण मागील १५ वर्षांपासून आम्हा प्रकल्पग्रस्तांची समस्या मार्गी लावण्यासाठी खा. मेंढे यांच्याकडे मात्र वेळ नाही. विमान सेवा सुरू केली, मग आम्हा प्रकल्पग्रस्तांची समस्या जमिनी देऊन केव्हा मार्गी लावाल ते तरी सांगा, असा सवाल येथील प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.

कधी मिळतील प्लाॅट अन् कधी बांधू घरे

अनेकवेळा या संपर्कात प्रशासनाला निवेदन देण्यात आली. लवकर प्लाॅट देण्याची मागणी करण्यात आली; मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अद्यापही आमचे पुनर्वसन झाले नाही. घरे बांधण्यासाठी जागा केव्हा उपलब्ध करून देणार, हे अद्यापही प्रशासनाने स्पष्ट सांगितले नाही. त्यामुळे याबाबत प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा.

- राजेंद्र तावाडे, माजी सरपंच बिरसी.

Web Title: Project victims staged a protest in front of gondia Birsi Airport on 21 march

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.