अतितीव्र कुपोषित बालकांना प्रोटीनयुक्त पोषण आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 09:29 PM2018-10-29T21:29:32+5:302018-10-29T21:29:57+5:30

आदिवासी क्षेत्रातील अंगणवाड्यांमध्ये सुरू करण्यात आलेल्या ग्राम बालविकास केंद्रात आता अतितीव्र कुपोषित बालकांना जास्त कॅलरी व प्रोटीनयुक्त पोषण आहार दिला जाणार आहे.

Prolific malnourished children get protein-rich nutrition diet | अतितीव्र कुपोषित बालकांना प्रोटीनयुक्त पोषण आहार

अतितीव्र कुपोषित बालकांना प्रोटीनयुक्त पोषण आहार

Next
ठळक मुद्देग्राम बालविकास केंद्र : शासनमान्य पुरवठादारांकडून होणार पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आदिवासी क्षेत्रातील अंगणवाड्यांमध्ये सुरू करण्यात आलेल्या ग्राम बालविकास केंद्रात आता अतितीव्र कुपोषित बालकांना जास्त कॅलरी व प्रोटीनयुक्त पोषण आहार दिला जाणार आहे. हा पाकीटबंद आहार शासनमान्य पुरवठादारांकडून पुरविला जाणार असल्यामुळे आतापर्यंत स्थानिक पातळीवर दिला जाणारा आहार बंद होईल. यांतर्गत आहारावर शासन प्रतिदिन प्रतिबालक ७५ रु पयापर्यंत खर्च करणार आहे.
राज्यातील कुपोषित बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी आदिवासी क्षेत्रात ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्याचा शासन निर्णय गेल्यावर्षी ११ आॅगस्ट रोजी महिला व बालविकास विभागाने जारी केला होता. त्यात शासनाकडून आहार पुरवठा करण्याचे सूतोवाच करण्यात आले होते. मात्र काही बचत गटांच्यावतीने यासंदर्भात न्यायालयाकडे धाव घेतल्याने तो निर्णय स्थगित होता.
आदिवासीबहुल जिल्ह्यांमधील अंगणवाड्यांमध्ये बालविकास केंद्र सुरू केले असले तरी त्यांना लागणारा आहार स्थानिकस्तरावरच बनविला जात होता.
आता न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर शासन निर्णयानुसार मान्यताप्राप्त पुरवठादाराकडून तो आहार पुरविला जाणार असल्याचे पत्र सर्व आदिवासीबहुल जिल्ह्यांना पाठविण्यात आले आहे.
जिल्ह्यात सध्या ५७५ अतितीव्र कुपोषित बालके आहेत. नोव्हेंबर महिन्यापासून राज्यात सर्वत्र नवीन आहार पुरविला जाणार आहे. या नवीन आहारामुळे कुपोषित बालकांचे प्रमाण घटेल, अशी आशा महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
पाकीटबंद आहाराचा तीनदा डोज
जागतिक आरोग्य संघटना व युनिसेफच्या शिफारसीनुसार तयार केलेल्या या नवीन आहारात सर्व प्रकारचे व्हिटॅमिन, कॅल्शियम, सोडियम, मॅग्नेशियम, फोलिक अ‍ॅसिड, आयोडिन, फॅटी अ‍ॅसिड, साखर, शेंगदाण्याचा कूट असे घटक राहणार आहेत. अंगणवाडीत येणाऱ्या अतितीव्र कुपोषित बालकाला तेथील सेविका हा पाकीटबंद विशेष आहार दिवसातून किमान तीन वेळा खाऊ घालेल. शिल्लक राहिलेले पाकीट बालकाला घरी घेऊन जाण्यासाठी पालकाकडे दिले जाईल. दुसऱ्या दिवशी ते रिकामे झालेले पाकीट अंगणवाडीत संबंधित पालकांकडून जमा केले जाईल.

Web Title: Prolific malnourished children get protein-rich nutrition diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.