बीएएमएस अर्हताधारक वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदोन्नती द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:32 AM2021-09-21T04:32:01+5:302021-09-21T04:32:01+5:30
गेल्या २० वर्षापासून पदोन्नतीच्या हक्कापासून वंचित असलेल्या बीएएमएस अर्हताधारक वैद्यकीय अधिकारी गट-ब यांना सेवेत पडलेला खंड क्षमापित करुन वैद्यकीय ...
गेल्या २० वर्षापासून पदोन्नतीच्या हक्कापासून वंचित असलेल्या बीएएमएस अर्हताधारक वैद्यकीय अधिकारी गट-ब यांना सेवेत पडलेला खंड क्षमापित करुन वैद्यकीय अधिकारी गट-अ च्या संवर्गात पदोन्नती देऊन त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करावा, अशी मागणी करीत वैद्यकीय अधिकारी गट-ब अविरतपणे आदिवासी दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील अतिदुर्गम भागात सेवा देत आहेत. कोरोना सारख्या महाभयंकर साथीच्या आजारात उल्लेखनीय कामगिरी बजावत नागरिकांच्या आरोग्याची काळजी त्यांनी घेतली आहे. परंतु त्यांच्या सेवेत पडलेला खंड क्षमापित न करता त्यांना कोणत्याही प्रकारचा शासकीय लाभ न देता वैद्यकीय अधिकारी गट- अ च्या संवर्गातील पदोन्नतीपासून वंचित ठेवून शासनाने त्याच्यावर अन्याय केला आहे.
या अन्यायाविरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करुन त्यांनी न्याय मागितला होता. त्यात न्यायालयाने शासनास निर्देश करुनही न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करीत त्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणी आणि वैद्यकीय अधिकारी गट-अ संवर्गातील पदोन्नती शासन डावलत असल्याचा आरोप महासंघ करीत आहे. अशात बीएएमएस अर्हताधारक वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदोन्नती द्या अशी मागणी महासंघाने केली आहे. महासंघाचे अध्यक्ष डॉ. अरुण कोळी यांच्या मार्गदर्शनात निवेदन देताना डॉ. अमर खोब्रागडे, डॉ. प्रेमकुमार बघेले, डॉ. अमित खोडणकर, डॉ. शिवप्रसाद महेशकर, डॉ. शिवशंकर हरिणखेडे, डॉ. किरसान, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डॉ. पिंकू मंडल प्रामुख्याने उपस्थित होते.