२९० तलावांत होणार मासोळ्यांचे संवर्धन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:08 AM2017-11-01T00:08:02+5:302017-11-01T00:08:24+5:30
ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळावा यासाठी महाराष्टÑ शासनाने यावर्षीपासून तलाव तेथे मासोळी अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळावा यासाठी महाराष्टÑ शासनाने यावर्षीपासून तलाव तेथे मासोळी अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सन २०१७-१८ या वर्षासाठी जिल्ह्यातील ५१६ तलावांची निवड करण्यात आली होती. यातील २९० तलावांमध्ये मासे टाकण्यात आले. तर २२६ तलावांत पाण्याचा ठणठणाट असल्याने मासोळ्यांचे उत्पादन या तलावात यंदा घेता येणार नाही.
गोंदिया तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे. मालगुजारी तलावांसह मोठ्या प्रमाणात तलावांची संख्या असल्याने या तलावांमध्ये मासेमारीचा व्यवसाय चांगला होऊ शकतो. याच दृष्टीने शासनाने तलाव तेथे मासोळी अभियान राबविण्याचे ठरविले. यासाठी जिल्हा परिषदेने गोंदिया जिल्ह्यातील ५१६ तलाव मासोळी उत्पादनासाठी निवडले होते. परंतु यंदा पावसाअभावी अनेक तलावांमध्ये पाण्याचा ठणठणाट असल्यामुळे २२६ तलावांमध्ये मासोळी संवर्धन करता येणार नाही. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ५५ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ५ तलावांमध्ये ११३.५ लाख जिरे टाकण्यात आले आहेत. देवरी तालुक्यातील ४९ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी १४ तलावात २९० किलो बोटूकली तर ४ तलावांमध्ये ३ लाख जिरे टाकण्यात आले. आमगाव तालुक्यातील २४ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ४ तलावात ६५ किलो बोटूकली तर ११ तलावांमध्ये ६५ लाख जिरे टाकण्यात आले. गोंदिया तालुक्यातील ९५ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ६८ तलावात ३२१ किलो बोटूकली तर ५३ तलावांमध्ये १३० लाख जिरे टाकण्यात आले. सालेकसा तालुक्यातील ७४ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ४९ तलावात ७११ किलो बोटूकली तर ४ तलावांमध्ये १४ लाख जिरे टाकण्यात आले. सडक-अर्जुनी तालुक्यातील ७८ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी २१ तलावात २३० किलो बोटूकली तर ९ तलावांमध्ये ३० लाख जिरे टाकण्यात आले. तिरोडा तालुक्यातील ६६ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ५ तलावात १३० किलो बोटूकली तर ९ तलावांमध्ये ५५ लाख जिरे टाकण्यात आले. गोरेगाव तालुक्यातील ७५ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी २३ तलावात ३१४ किलो बोटूकली तर ११ तलावांमध्ये ७४ लाख जिरे टाकण्यात आले. गोंदिया जिल्ह्यातील ५१६ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी १८४ तलावात २०६१ किलो बोटूकली तर १०६ तलावांमध्ये ४८४.५ लाख जिरे टाकण्यात आले आहेत.
८५३५ क्विंटल मासोळ्यांचे उत्पादन
जिल्ह्यातील २९० तलावांमध्ये मासोळ्यांचे संवर्धन होत असल्यामुळे या तलावातून ८ हजार ५३५ क्विंटल मासोळ्यांचे उत्पादन होणार असल्याचा अंदाज जिल्हा परिषदेने वर्तविला आहे. गाव तेथे मासोळी अभियानाला गोंदिया जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी रवींद्र ठाकरे, जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी (पंचायत) राजेश बागडे व इतर अधिकारी कामाला लागले आहेत.
गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा असल्यामुळे या जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला वाव आहे. मालगुजारी तलावांमध्ये सहजरीत्या मोठ्या प्रमाणात मासोळ्यांचे उत्पादन घेतले जावू शकते. यासाठी शासनाचे तलाव तेथे मासोळी अभियान जिल्ह्यात यशस्वी होणार आहे. यंदा दुष्काळामुळे संपूर्ण तलावात मासोळ्यांचे उत्पादन घेतले जात नसले तरी २९० तलावांमध्ये मासोळ्यांचे संवर्धन केले जाणार आहे.
रवींद्र ठाकरे
मुख्य कार्यपालन अधिकारी
जि.प.गोंदिया