मालमत्ता करवसुली वांद्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 01:20 AM2019-01-12T01:20:31+5:302019-01-12T01:20:59+5:30
मालमत्ता कर वसुली अगोदरच कमी असताना त्यात आता मोहरीरची बीएलओ ड्यूटी लावण्यात आली आहे. नगर परिषदेला यंदा ९.३५ कोटी मालमत्ता कर वसुली टार्गेट असतानाच कर विभागात बोटावर मोजण्या एवढेच कर्मचारी उरले आहेत.
कपिल केकत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मालमत्ता कर वसुली अगोदरच कमी असताना त्यात आता मोहरीरची बीएलओ ड्यूटी लावण्यात आली आहे. नगर परिषदेला यंदा ९.३५ कोटी मालमत्ता कर वसुली टार्गेट असतानाच कर विभागात बोटावर मोजण्या एवढेच कर्मचारी उरले आहेत. परिणामी यंदा नगर परिषदेची मालमत्ता कर वसुली वांद्यातच दिसून येत आहे. मागील वर्षी ४८.८४ टक्के कर वसुली झाली होती. यंदा मात्र तो आकडाही सर करणे सध्या तरी कठीणच वाटत आहे.
मागील वर्षी ४८ टक्केच्या घरात मालमत्ता कर वसुली झाली होती. नगर परिषदेला मालमत्ता कर वसुली हेच मोठे आर्थिक स्त्रोत असून एवढी कमी वसुली झाल्याने नगर परिषदेची डोकेदुखी वाढली होती. त्यामुळे यंदा तरी किमान ८० टक्के कर वसुली व्हावी यासाठी नगर परिषदेने आतापासूनच नियोजन सुरू केले होते. यंदा नगर परिषदेला मागील थकबाकी ४ कोटी ८६ लाख ६५ हजार ३१७ रूपये व चालू मागणी ४ कोटी ४८ लाख ७९ हजार १३१ रूपये असे एकूण ९ कोटी ३५ लाख ४४ हजार ४४८ रूपये कर वसुलीचे टार्गेट आहे. त्यानुसार, नगर परिषदेकडून प्रयत्न केले जात होते. मात्र मधातच आता बीएलओचे काम आले असून त्यासाठी नगर परिषद कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावण्यात आली आहे. त्यातही कर विभागातील मोहरीर व अन्य कर्मचाºयांचाही यात समावेश करण्यात आल्याने आता कर विभागात बोटावर मोजण्या एवढेच कर्मचारी उरले आहेत.
कर वसुलीचे काम मोहरीर करीत असून त्यांना आपापल्या प्रभागातील भक्कम माहिती आहे. मात्र मोहरीर आता बीएलओच्या कामात लागल्याने कर वसुलीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे मागील वर्षी झालेली ४८.८४ टक्के वसुलीही यंदा जड दिसत आहे.
मालमत्ता कर वसुली हेच नगर परिषदेचे सर्वात मोठे आर्थिक स्त्रोत आहे. मात्र यंदा मालमत्ता कर वसुलीच वांद्यात दिसून येत असल्याने नगर परिषदेची अडचण नक्कीच वाढणार यात शंका नाही. त्यादृष्टीने आता नगर परिषद यावर काय तोडगा काढते याकडे लक्ष लागले आहे.
चार कर्मचांऱ्यांवर वसुलीची धुरा
नगर परिषद कर विभागात १७ मोहरीर असून त्यातील १६ मोहरीरची बीएलओ ड्यूटी लावण्यात आली आहे. म्हणजे एकच मोहरीर उरले आहेत. शिवाय, सहायक कर निरीक्षक खोब्रागडे यांची बदली झाली आहे. तर त्यांच्या जागेवर परवाना विभागातील घोडेस्वार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे नाव बीएलओमधून वगळण्यात आल्याची माहिती आहे. शिवाय अतिरीक्त प्रभार देण्यात आलेले मुकेश मिश्रा व श्याम शेंडे यांच्यापैकी शेंडे यांची ड्यूटी लावण्यात आली आहे. तर जगदीश गाते हे कनिष्ठ लिपीक उरले आहेत. त्यामुळे चार कर्मचाऱ्यांवर वसुलीची धुरा आहे.