उपोषणकर्ते व प्रशासनच जबाबदार
By admin | Published: May 28, 2016 01:52 AM2016-05-28T01:52:09+5:302016-05-28T01:52:09+5:30
महालगाव येथील प्रकरण चिघळवण्यात उपोषणकर्ते जबाबदार आहेत. ते आमरण उपोषणाला बसले.
गावकऱ्यांचा आरोप : महालगाव प्रकरण
अर्जुनी-मोरगाव : महालगाव येथील प्रकरण चिघळवण्यात उपोषणकर्ते जबाबदार आहेत. ते आमरण उपोषणाला बसले. ५४ दिवस पूर्ण झालेत. मात्र वैद्यकीय तपासणी अहवालात त्यांच्या प्रकृतीत बदल नाही. हे कसले उपोषण? याला तहसील व पोलीस प्रशासन एकप्रकारे गुप्तपणे सहकारी करीत असून प्रकरण चिघळवण्यात उपोषणकर्ते व प्रशासन जबाबदार आहे, असा आरोप पत्रपरिषदेत तेथील काही गावकऱ्यांनी केला. सोबतच हे प्रकरण कुठेतरी संपविण्यासाठी सहकार्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
महालगाव येथील गट क्र. १७९ मध्ये ०.१० हे.आर. जागा ही १९९६-९७ च्या अतिक्रमण पंजीत बौद्धांचा झेंडा अशी नोंद आहे. येथे नियमितपणे बौद्ध धर्मियांचे सार्वजनिक कार्यक्रम होतात. २००७ मध्ये दलित वस्ती योजनेंतर्गत समाजभवनाचे बांधकाम झाले. समाज भवनाच्या समानांतर चार सिमेंटचे कॉलम उभे करुन बौद्ध बांधवांनी वर्गणी गोळा करुन एका खोलीचे बांधकाम केले व याठिकाणी तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली. लगेच दुसऱ्या दिवशी गावातील अनुसूचित जमातीच्या लोकांनी विरोध दर्शविला. तेव्हापासूनच दोन जातीत हा वाद सुरू झाला.
१४ एप्रिल रोजी डॉ.आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी परवानगी देण्यात आली. कलम १४४ लागू करुन कार्यक्रम पार पडला. बुद्ध जयंतीच्या निमित्ताने पुन्हा परवानगी मागण्यात आली. प्रशासनाने परवानगी दिली. बंदोबस्तासाठी ५० ते ६० पोलीस तैनात करण्यात आले. बौद्ध समाजबांधव कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. मात्र अनु. जमातीच्या लोकांनी लाठ्या-काठ्या घेऊन ध्वजाभोवती घेराव केला. ज्याप्रकारे आंबेडकर जयंतीला कलम १४४ लागू होती ती कलम बौद्ध पौर्णिमेगच्या दिवशी असती तर हा प्रकार घडलाच नसता. याचा अर्थ प्रशासन त्या लोकांना सहकार्य करीत असल्याचा आरोप पत्रपरिषदेत करण्यात आला. महालगावच्या दर्शनी भागात असलेल्या प्रवेशद्वारावर चार ते पाच महापुरुषांची चित्रे आहेत. यापैकी डॉ. आंबेडकर यांच्या चित्रावर शेण फेकण्यात आले. बौद्ध बांधव प्रवेशद्वाराजवळ एकत्र आले तेव्हा अनु. जमातीची लोकं धावून आली. महिलांना खाली पाडून मारहाण करण्यात आली. जिवे मारणे व खैरलांजीसारखे प्रकरण घडवून आणण्याची धमकी दिली. मारहाणीत ४ महिला व एका पुरुषाला दुखापत झाली. त्यांना ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. या प्रकरणात तहसीलदार, पोलीस अधिकारी व अनु. जमातीची लोकं सुनियोजित पद्धतीने अल्पसंख्याक असलेल्या बौद्ध समाजावर अन्याय, अत्याचार करीत आहेत असा आरोप त्यांनी केला. सत्यभामा रंगारी या महिलेच्या घरात घसून अनु. जमातीच्या लोकांनी मारहाण केली. गावातील प्रतिष्ठित मंडळी समजवण्यासाठी आल्यास त्यांना सुद्धा मारहाण करु, अशी धमकी योगेश मारगाये, दिनेश मारगाये व मुकेश नाईक यांनी दिल्याचा आरोप पत्रपरिषदेत करण्यात आला. संबंधितांवर रितसर कारवाई करुन हे प्रकरण संपविण्याची अपेक्षा केली. पत्रपरिषदेला रमेश रामटेके, दिलीप रामटेके, वामन खोब्रागडे, हेमंत गोंडाने, ईश्वरदास खोब्रागडे, सोनदास गणवीर, यशवंत गणवीर, नाना शहारे, भाऊराव खोब्रागडे,व्यंकट खोब्रागडे,नरेश रामटेके उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)