राजकीय पेचात नवीन १२८ धान खरेदी केंद्रांचे प्रस्ताव; २८ डिसेंबरच्या बैठकीत होणार निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 03:45 PM2022-12-24T15:45:22+5:302022-12-24T15:48:41+5:30

पदाधिकारी, कार्यकर्त्यांची होणार चांदी

Proposal for new 128 Paddy Procurement Centers in Political Embarrassment; The decision will be taken in the december 28 meet | राजकीय पेचात नवीन १२८ धान खरेदी केंद्रांचे प्रस्ताव; २८ डिसेंबरच्या बैठकीत होणार निर्णय

राजकीय पेचात नवीन १२८ धान खरेदी केंद्रांचे प्रस्ताव; २८ डिसेंबरच्या बैठकीत होणार निर्णय

googlenewsNext

गोंदिया : जिल्ह्यात धान खरेदी करण्यासाठी नवीन १२८ धान खरेदी केंद्रांचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावावर २८ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार आहे. पण नेमके केंद्र कुणाला द्यायचे याचा निर्णय नागपुरातील भाजपचे वरिष्ठ नेते घेणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ही केंद्र पुन्हा राजकीय पेचात अडकण्याची चिन्हे आहे.

शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जात. यंदा खरीप हंगामात जिल्हा मार्केटिंग ११६, तर आदिवासी विकास महामंडळाची ४१ केंद्रांवरून धान खरेदी सुरू आहे. पण खरेदी केंद्राची संख्या अपुरी असून, ती वाढविण्यासाठी सेवा सहकारी संस्थाकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहे. यासाठी १२८ नवीन धान खरेदी केंद्राचे प्रस्ताव जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे आले आहे, पण या प्रस्तावावर अद्यापही अंतिम शिक्का मोर्तब झाले नाही. शासकीय धान खरेदी केंद्र राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मिळत असल्याची बाब लपून राहिली नाही.

राज्यात ज्यांचे सरकार त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केंद्र मिळत असल्याची यापूर्वीच स्पष्ट झाली. काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारने तोंड पाहून धान खरेदी केंद्राचे वाटप केल्याचा आरोप केला होता, पण यंदा जिल्ह्यातील ११ धान खरेदी केंद्र वाटप करताना सुद्धा तेच धोरण अवलंबिण्यात आले. त्यानंतर आता १२८ नवीन धान खरेदी केंद्राची यादी तयार आहे.

या यादीवर विद्यमान सरकारच्या वरिष्ठ नेत्यांनी हातदेखील फिरविला आहे. यासाठी दोन दिवसांपूर्वीच फेडरेशनचा एक अधिकारी ही फाइल घेऊन एका नेत्याच्या घरी जाऊन आला. आता २८ डिसेंबरला होणाऱ्या बैठकीत केवळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीची केवळ औपचारिकता पार पाडली जाणार आहे. आधीच्या सरकारने तोंड पाहून केंद्र वाटप केले. मग आताचे सरकार नेमके काय पाहून केंद्र वाटप करणार? असा सवालदेखील उपस्थित केला जात आहे.

नवीन धान खरेदी केंद्र नेमके कुणासाठी

धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून होणारी उलाढाल ही लाखो रुपयांच्या घरात आहे. एकदा का धान खरेदी केंद्र मिळाले तर पुढे काहीच पाहायचे नसते. त्यामुळे मागील तीन-चार वर्षांत धान खरेदी केंद्राला फार महत्त्व आले आहे. कोणताही पदाधिकारी राजकीय पक्षात प्रवेश करताना बाकी काही नको केवळ एक धान खरेदी केंद्र द्या, अशी मागणी करू लागला आहे. त्यामुळे हे धान खरेदी केंद्र नेमके कुणासाठी हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

तर धान खरेदी केंद्राची संख्या होणार २४४

जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे जिल्ह्यात सध्या ११६ धान खरेदी केंद्र सुरू आहे. त्यातच आता नवीन १२८ धान खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाल्यास एकूण धान खरेदी केंद्रांची संख्या २४४वर पोहचेल. केंद्र वाढल्याने शेतकऱ्यांना सोयीचे होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: Proposal for new 128 Paddy Procurement Centers in Political Embarrassment; The decision will be taken in the december 28 meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.