समृद्धीच्या विस्ताराने जिल्ह्यात येणार समृद्धी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2022 05:00 AM2022-03-13T05:00:00+5:302022-03-13T05:00:07+5:30
लोकमत समूहाव्दारे ८ डिसेंबर २०२१ रोजी मुंबई येथे आयोजित इन्फ्रास्ट्रक्चर कॉनक्लेव्हमध्ये विकास कामांवरील चर्चेत लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खा. विजय दर्डा यांनी समृद्धी महामार्गाचा विस्तार भंडारा आणि गोंदियापर्यंत करण्याची मागणी केली होती. त्याचीच घोषणा शुक्रवारी अर्थसंकल्प सादर करताना राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. या महामार्गाच्या विस्तारामुळे गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग प्रशस्त होणार असल्याचा विश्वास दर्डा यांनी व्यक्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि.११) राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना समृद्धी महामार्गाचा गोंदियापर्यंत विस्तार करण्याची घोषणा केली. नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग भंडारा आणि गोंदियापर्यंत विस्तारित करण्यात आल्याने जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यास याची निश्चितच मदत होणार आहे. समृद्धीच्या विस्ताराने जिल्ह्यात समृद्धी येणार असल्याची चर्चा जिल्हावासीयांमध्ये आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे या महामार्गाचे नामकरण करण्यात आले आहे. या महामार्गाचा विस्तार करून तो नागपूर ते भंडारा-गोंदिया आणि नागपूर ते गडचिरोली असे करण्याचे नियोजन राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आले आहे.
या महामार्गामुळे राज्याच्या पूर्वेकडील दोन जिल्हा मुंबई आणि पुण्याशी जलद मार्गाने जोडले जाणार आहे. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे उत्पादन घेतले जाते. अलीकडे भाजीपाला आणि फळपिकांचीसुद्धा लागवड केली जात आहे. त्यामुळे येथे उत्पादित शेतमाल मुंबईच्या बाजारपेठेत या जलद मार्गाने पोहचविणे शक्य होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे अधिकचे पदरात पाडून घेण्यास मदत होणार आहे. महामार्गाच्या विस्ताराने जिल्ह्यातील जमिनीचे दरदेखील वाढणार आहे. जलद महामार्गामुळे उद्योगांच्या विकासाला सुध्दा चालना मिळणार असून भविष्यात उद्योगांची स्थापना होऊन रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासदेखील मदत होणार आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गातून जिल्ह्यात समृद्धी येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
कृषी मालाला बाजारपेठ उपलब्ध होणार
- गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात शेतीसह भाजीपाल्याचीसुद्धा मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. भाजीपाला हा लवकर नाशवंत होणारा घटक आहे. त्यामुळे याची जलदगतीने बाजारपेठेपर्यंत वाहतूक करणे गरजेचे आहे. समृद्धी महामार्ग हा मुंबई व पुण्याशी जोडणारा जलदगती महामार्ग असल्याने याची कृषी मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यास मदत होणार असल्याचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी सांगितले.
उद्योगाला मिळेल चालना
- समृद्धी महामार्गाचा आता गोंदियापर्यंत विस्तार होणार असल्याने जिल्ह्यातील उद्योगाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. समृद्धी महामार्गामुळे कृषी, उद्योगाला चालना मिळून रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे. त्यामुळे गोंदिया आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्यांसाठी ही बाब निश्चितच कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
विकासाचा मार्ग प्रशस्त होईल
- लोकमत समूहाव्दारे ८ डिसेंबर २०२१ रोजी मुंबई येथे आयोजित इन्फ्रास्ट्रक्चर कॉनक्लेव्हमध्ये विकास कामांवरील चर्चेत लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खा. विजय दर्डा यांनी समृद्धी महामार्गाचा विस्तार भंडारा आणि गोंदियापर्यंत करण्याची मागणी केली होती. त्याचीच घोषणा शुक्रवारी अर्थसंकल्प सादर करताना राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. या महामार्गाच्या विस्तारामुळे गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग प्रशस्त होणार असल्याचा विश्वास दर्डा यांनी व्यक्त केला आहे.