जुन्या पेन्शनसाठी पुन्हा एल्गार; गुरुवारपासून बेमुदत संप : विविध संघटनांनी दिले समर्थन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 03:23 PM2024-08-26T15:23:27+5:302024-08-26T15:27:09+5:30
Gondia : कर्मचारी, शिक्षकांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या आश्वासनाची शासनाने पूर्तता करण्यासाठी राज्य कर्मचाऱ्यांनी पुन्हा बंडाचा एल्गार
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : जुन्या पेन्शन प्रमाणे कर्मचारी, शिक्षकांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या आश्वासनाची शासनाने पूर्तता करण्यासाठी राज्य कर्मचाऱ्यांनी पुन्हा बंडाचा एल्गार केला आहे. राज्य सरकारी, निम सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी गुरुवारपासून (दि. २९) बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय राज्यस्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
संघटनेच्या वतीने प्रसिद्धी दिलेल्या पत्रकानुसार, जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मार्च २०२३ मध्ये सात दिवसांचा बेमुदत संप केला होता. सरकारने संपर्ककर्त्यांशी चर्चा करून संप मागे घेण्याचे आवाहन केले होते.
त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना जाहीर केली. मात्र, आजतागायत शासनाने याबाबत शासन निर्णय किंवा अधिसूचना काढलेली नाही. त्यामुळे राज्यातील सुमारे साडेआठ लाख कर्मचारी, शिक्षकांमध्ये सुधारित पेन्शन योजना लागू करण्याबाबत शंका निर्माण झाली आहे. यासंदर्भात मुंबईत राज्यस्तरीय समन्वय समितीची नुकतीच बैठक पार पडली. त्यात चर्चेअंती गुरुवारपासून (दि. २९) बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मध्यवर्ती संघटनेचे राज्य सहसचिव तथा जिल्हाध्यक्ष आशिष रामटेके यांनी कळविले आहे.
या आहेत संघटनेच्या मागण्या
केंद्राप्रमाणे ग्रॅज्युएटी मिळावी, राशीकरण पुनर्स्थापना करावी, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी जाहिरात-अधिसूचनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया सुरू झालेल्या कर्मचारी-शिक्षकांना १९८२ ची जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी, सेवा- निवृत्तीचे वय ६० वर्षे करावे, रिक्त असलेली ४० टक्के पदे त्वरित भरावी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष चर्चासत्र आयोजित करावे, आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढावे, या संघटनेच्या प्रमुख मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था कर्मचाऱ्यांचे समर्थन
गुरुवारपासून (दि. २९) जुनी पेन्शन हक्क संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपाला येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था कर्मचारी संघटनेनेही आपले समर्थन दिले आहे. याबाबत संघटनेचे अध्यक्ष शैलेश अंबादे, उपाध्यक्ष रूपराजसिंग कोडापे, सचिव जितेंद्र रामटेके, मार्गदर्शक व सदस्य रमेश रावलानी, वर्षा कुर्वे, रोहिनी उईके, प्रिया राठोर, कविता राठोर, विलास गावंडे, सौरभ गावंडे, चंद्रशेखर पारधी, दीपक ठाकरे, संजय सहारे, अविनाश केणे आदींनी कळविले आहे.