अर्ध नग्न व मुंडन आंदोलन करून केला शासनाचा निषेध; झाशी नगर उपसा सिंचन योजनेच्या कालव्यावर आंदोलन

By अंकुश गुंडावार | Published: November 20, 2023 05:57 PM2023-11-20T17:57:26+5:302023-11-20T17:57:36+5:30

शासनाच्या जलसंधारण विभागाअंतर्गत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी ही योजना मंजूर करण्यात आली होती.

Protested the government by performing half-naked and shaven protest Movement on canal of Jhansi Nagar Upsa Irrigation Scheme | अर्ध नग्न व मुंडन आंदोलन करून केला शासनाचा निषेध; झाशी नगर उपसा सिंचन योजनेच्या कालव्यावर आंदोलन

अर्ध नग्न व मुंडन आंदोलन करून केला शासनाचा निषेध; झाशी नगर उपसा सिंचन योजनेच्या कालव्यावर आंदोलन

गोंदिया: तब्बल १२७ कोटी रुपये मंजूर असलेली उपसा सिंचन योजना प्रशासनासह लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे रखडली असून या योजनेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अर्ध नग्न व मुंडन आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन २० नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे गोंदिया जिल्ह्याचे कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांच्या नेतृत्वात झाशी नगर उपसा सिंचन योजनेच्या कालव्यावर करण्यात आले. या आंदोलनाने शासनाचा निषेध करण्यात आला आहे. सविस्तर असे की, ऑक्टोबर १९९६ ला इटियाडोह प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावा म्हणून झाशी नगर उपसा सिंचन योजना मंजूर करण्यात आली होती. या योजनेवर आतापर्यंत १२७ कोटी रुपये खर्च करण्यात आले असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. 

दरम्यान, शासनाच्या जलसंधारण विभागाअंतर्गत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी ही योजना मंजूर करण्यात आली होती मात्र शासनाची उदासीनता व राजकारण्यांच्या नाकर्तेपणामुळे तब्बल २८ वर्षे लोटून देखील बाधित असलेल्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळू शकले नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे गोंदिया जिल्ह्याचे कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांच्या नेतृत्वात प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन प्रस्तावित गावांना पाणी देण्याची मागणी करण्यात आली होती असे न झाल्यास अर्ध नग्न व मुंडन आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता.

त्यानुसार २० नोव्हेंबर रोजी झाशीनगर उपसा सिंचन योजनेच्या कालव्यावर अर्ध नग्न व मुंडन आंदोलन करण्यात आले. यावेळी सुरेश खोब्रागडे, बाबुलाल नेवारे, हिरालाल डोंगरे, राहुल भोयर, कुंडलिक चनाप, हेमराज लाडे, राजकुमार इश्वार, रामदास पेकु, सुदाम दोनोडे, भाष्कर डोमळे, गोवर्धन राऊत, देविदास राऊत, राजकुमार कुरसुंगे, चिंतामण भोगारे, अमृत शेंडे, दिपक दाणे,चेतन मोहतुरे, अजय मेश्राम यांसह अन्य शेकडो प्रकल्पबाधित शेतकरी ऊपस्थित होते.

४२ गावातील जवळपास ५० हजार शेतकऱ्यांना मिळणार पाणी
इटियाडोह प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावा म्हणून झाशी नगर उपसा सिंचन योजना मंजूर करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत प्रकल्पातील प्रस्थापित १२ गावे व नवेगाव बांधत जलाशया अंतर्गत ३२ गावातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करावयाचे होते. ही योजना पूर्ण होऊन शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध झाल्यास जिल्ह्यातील जवळपास ५० हजार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

झाशी नगर हे गाव १९७० ला पुनर्वसित झाले आहे. हे गाव कोरडवाहू असल्याने येथील शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी खासदार महादेवराव शिवनकर यांच्या नेतृत्वात ही योजना सुरू करण्यात आली होती. येथील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळेल व त्यांचे जीवनमान उंचावेल हा मुख्य हेतू होता. ही योजना पूर्ण न झाल्यास येणाऱ्या २ ते ३ महिन्यात संपूर्ण गावाच्या वतीने जल आंदोलन करण्यात येईल व २०२४ च्या निवडणुकीला आम्ही बहिष्कार टाकू. - राजाराम कुरसुंगे ( प्रकल्पबाधित शेतकरी )

मंजूर झालेल्या निधी पैकी जवळपास ८६ कोटी खर्च करून देखील झाशी नगरच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी गेलेले नाही. २०२२ मध्ये शासनाने भूलथापा देऊन केवळ ४ दिवस नवेगाव बांधामध्ये पाणी पाडले. प्रस्तावित १२ व नवेगाव बांध जलाशयातील ३२ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ही योजना पूर्ण झाली पाहिजे म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. - मिथुन मेश्राम ( कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट)

Web Title: Protested the government by performing half-naked and shaven protest Movement on canal of Jhansi Nagar Upsa Irrigation Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.