घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास रेती उपलब्ध करून द्या ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:30 AM2021-03-10T04:30:00+5:302021-03-10T04:30:00+5:30
केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी घरकुल योजनेचे काम फक्त रेतीअभावी रखडलेले आहे. परंतु आता प्रशासन रेतीघाटातून ५ ब्रास रेती ...
केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी घरकुल योजनेचे काम फक्त रेतीअभावी रखडलेले आहे. परंतु आता प्रशासन रेतीघाटातून ५ ब्रास रेती विनामूल्य घरकुल लाभार्थ्यांना देण्यास तयार झाले असून, तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तहसीलदारांना दिले आहेत. अशात लाभार्थ्यांनी तहसीलदारांकडे अर्ज केल्यानंतर त्यांना विनामूल्य रेती उपलब्ध होणार आहे. यात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आणि शबरी आवास योजनेंतर्गत तालुक्यात शेकडो घरकुल मंजूर झाले आहेत. परंतु या लाभार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा रेतीने केला आहे. जिल्ह्यातील एकही रेतीघाटाचा लिलाव न झाल्याने रेतीच उपलब्ध होऊ शकत नाही. यात विशेष म्हणजे, चोरट्या मार्गाने सर्वत्र रेती उपलब्ध होत असली तरी ती अधिकच्या किमतीत रेती घेऊन घरकुल बांधणे आवाक्याबाहेरचे आहे. परिणामी शेकडो घरकुलाचे बांधकाम रखडले होते.
त्यामुळे तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना शिलापूर घाट, चुलंबी घाट, पालांदूर-जमी. व पिपरखारी घाटातून रेती उपलब्ध करून द्यावी, असे निवेदनात नमूद आहे. या मागणीसाठी शिवसेना तालुका प्रमुख सुनील मिश्रा यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने तहसीलदार बोरुडे यांची भेट घेऊन रेती उपलब्धतेविषयी चर्चा केली व निवेदन दिले. याप्रसंगी शहर प्रमुख राजा भाटिया, विधानसभा संघटक राजीक खान, जिल्हा महिला संघटिका करुणा कुर्वे, तालुका महिला संघटिका प्रीती उईके, युवा सेना महिला संघटिका प्रीती नेवारगडे, उपसंघटिका प्रीती नेताम, उपशहर प्रमुख महेश फुन्ने, वाॅर्ड प्रमुख कृष्णा राखडे, राजा मिश्रा, विकास राऊत, दिलीप राऊत, सचिन भेंडारकर, दीनदयाल मेश्राम, संजय राऊत व छन्नू नेवारगडे आदी उपस्थित होते.