कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 05:00 AM2020-06-11T05:00:00+5:302020-06-11T05:00:43+5:30
महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेस जिल्ह्यातील २८ हजार ६५५ शेतकरी पात्र ठरले होते. मात्र यापैकी आत्तापर्यंत यापैकी केवळ २२ हजार ५४८ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यात आला आहे. कर्जमाफीच्या रक्कमेपोटी त्यांच्या बँक खात्यावर ९० कोटी ४१ लाख रुपये जमा करण्यात आले आहे. तर अद्याप ५ हजार ३६७ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळायचा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. परिणामी या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जाची उचल करण्याची अडचण जात होती. हीच बाब ओळखून शासनाने सर्व जिल्हा आणि व्यापारी बँकाना कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याचे निर्देश दिले आहे. यासंबंधिचे निर्देश शासनाने सर्व व्यापारी, ग्रामीण आणि जिल्हा बँकाना दिले आहे. तसे आदेश सुध्दा सर्व बँकामध्ये धडकले आहे.
महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेस जिल्ह्यातील २८ हजार ६५५ शेतकरी पात्र ठरले होते. मात्र यापैकी आत्तापर्यंत यापैकी केवळ २२ हजार ५४८ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यात आला आहे. कर्जमाफीच्या रक्कमेपोटी त्यांच्या बँक खात्यावर ९० कोटी ४१ लाख रुपये जमा करण्यात आले आहे. तर अद्याप ५ हजार ३६७ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळायचा आहे. हे सर्व शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले असून त्यांच्या खात्यावर अद्याप कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली नाही.
त्यामुळे या शेतकऱ्यांचे पीक कर्ज खाते निरंक न झाल्याने त्यांना यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्जाची उचल करण्याची अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम देखील अडचणीत आला होता. शेतकऱ्यांची ओरड वाढली होती. तर मागील तीन महिन्यापासून राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने लॉकडाऊन होते.
त्यामुळे शासनाच्या महसुली उत्पन्नात घट झाली आहे. परिणामी शासनाने विविध खर्चाला कात्री लावली आहे. तसेच विविध शासकीय विभागांना सुध्दा खर्चात कपात करण्याचे निर्देश दिले आहे. सरकारकडे सध्या निधीचा अभाव असल्याने महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर रक्कम जमा करण्यास अडचण निर्माण झाली आहे.
त्यामुळे शासनाने यावर तोडगा काढत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम शासनाकडून येणे असल्याचे दाखवून त्यांना नवीन पीक कर्जाचे वाटप करण्याचे निर्देश दिले आहे. कर्जमाफीस पात्र ठरलेला एकही शेतकरी पीक कर्ज मिळण्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश जिल्ह्यातील सर्व जिल्हा, ग्रामीण आणि व्यापारी बँकाना दिले आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सुध्दा जिल्ह्यातील सर्व बँकांना या संबंधिचे निर्देश दिले आहे.
शासन देणार बँकांना व्याजाची रक्कम
महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत पात्र ठरलेल्या काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होणे बाकी आहे. मात्र यामुळे शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये यासाठी शासनाने ही कर्जमाफीची रक्कम शासनाकडून येणे असल्याचे दाखवून नवीन पीक कर्ज देण्याचे निर्देश दिले आहे. तसेच जोपर्यंत ही रक्कम शासनाकडून बँकाना प्राप्त होत नाही, तोपर्यंत या रक्कमेवरील व्याज शासन देणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.