खते व किटकनाशके ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करुन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:26 AM2021-08-01T04:26:50+5:302021-08-01T04:26:50+5:30
केशोरी : या वर्षी खरीप हंगामातील धान रोवणी आटोपण्याच्या टप्यात आली आहे. शेतकऱ्यांना धान पिकासाठी लागणारी खते व किटकनाशके ...
केशोरी : या वर्षी खरीप हंगामातील धान रोवणी आटोपण्याच्या टप्यात आली आहे. शेतकऱ्यांना धान पिकासाठी लागणारी खते व किटकनाशके ५० टक्के सवलतीच्या दरात शासनाच्या कृषी विभागाने उपलब्ध करुन देण्याची मागणी केशोरीचे सरपंच नंदू पाटील गहाणे यांनी केले आहे.
गेल्या वर्षीपासून सुरु असलेल्या कोरोना संसर्गाच्या महामारीमुळे शेतकरी वर्ग आर्थिक कचाट्यात सापडला आहे. शेतीची कामे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहेत. अशाही परिस्थतीत शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील धान रोवणी आटोपण्याच्या मार्गावर आली आहेत. खरीप हंगामातील शेती खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांजवळ पैसा उपलब्ध नाही. गेल्या वर्षीच्या खरीपातील मंजूर बोनस, बारदाना खर्च, आणि धानाची चुकारे अजूनही शासनाने दिले नाहीत. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. खरीपाचा खर्च कुठून करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यात खते आणि किटकनाशकाच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने खते व किटकनाशक औषधी विकत घेण्याचे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेवून रासायनिक खते व किटकनाशके औषधी ५० टक्के सवलतीच्या दरात शासनाच्या कृषी विभागाने उपलब्ध करुन देण्याची मागणी सरपंच नंदू पाटील गहाणे यांनी केली आहे.