प्रत्येक मजुरांचा हाताला कामे उपलब्ध करून घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:38 AM2021-02-27T04:38:45+5:302021-02-27T04:38:45+5:30
गोंदिया : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेबाबत यंत्रणेच्या उदासीन धाेरणामुळे मजुरांना रोजगार मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण ...
गोंदिया : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेबाबत यंत्रणेच्या उदासीन धाेरणामुळे मजुरांना रोजगार मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात अद्यापही मनरेगाची कामे सुरू न झाल्याने मजुरांची कामाच्या शोधात भटकंती सुरू आहे. जिल्ह्यातील मजुरांच्या कामाचे बजेट करा, तसेच यासाठी निधीची मागणी करून प्रत्येक मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्याचे निर्देश आमदार तथा रोजगार हमी योजनेचे अध्यक्ष मनोहर चंद्रिकापुरे यांनी दिले.
रोजगार हमी योजनेसंदर्भात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. बैठकीला जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, उपवनसंरक्षक कुलराजसिंह, रोजगार हमी विभागाचे उपजिल्हाधिकारी सचिन गोसावी, दुलाराम चंद्रिकापुरे उपस्थित होते. यावेळी आमदार चंद्रिकापुरे यांनी जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. तसेच किती मजुरांना सध्या काम उपलब्ध आहे, किती मजुरांची कामाची मागणी आहे, कामाचे काय नियोजन आहे व निधीची काय स्थिती आहे. याचा आढावा अधिकाऱ्यांकडून घेतला. तसेच जिल्ह्यातील मजुरांना अधिकाधिक कामे कसे उपलब्ध होईल या दृष्टीने नियोजन करण्यास सांगितले. तसेच रोजगार हमी याेजनेच्या कामात कुठलीच हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा सुद्धा दिला.