कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड उपलब्ध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:25 AM2021-04-19T04:25:50+5:302021-04-19T04:25:50+5:30
सडक अर्जुनी : जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अर्जुनी मोरगाव आणि सडक ...
सडक अर्जुनी : जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यात कोविड केअर सेंटर उभारण्यात यावे, तसेच या सेंटरमध्ये ऑक्सिजन सुविधेसह कोरोना रुग्णांवर आवश्यक उपचार करावेत. खाटांची उपलब्धता, ऑक्सिजन बेड, गंभीर रुग्णांना लागणारे रेमडेसिविर इंजेक्शन आणि औषधांचा पुरवठा त्वरित करण्याची मागणी माजी पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे व पालकमंत्री नवाब मलिक यांच्याकडे केली आहे.
अर्जुनी - मोरगाव आणि सडक - अर्जुनी तालुक्यात कोविड केअर सेंटर संख्या वाढत्या रुग्ण संख्येपुढे तोकडी पडत आहेत. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांमध्ये गृहविलगीकरणासाठी आवश्यक ती व्यवस्था नसते, अशात घरातील कोणाला कोरोनाची लागण झाली तर पूर्ण कुटुंबालाच संसर्गाचा धोका वाढतो. वाढत्या रुग्णसंख्येला इन्स्टिट्यूशनल आयसोलेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन कोविड केअर सेंटर सुरु करावे, लसदेखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. या प्रकाराने रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करुन देण्यात यावी. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीसंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांच्याशी चर्चा केली. तसेच अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेऊन त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली. सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथे सुरू असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना तपासणी चाचणी करण्यात येत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी सौंदड येथे कोरोना चाचणी त्वरित सुरु करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत.