थकीत चुकारे व बारदाणा उपलब्ध करून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 09:39 PM2018-12-02T21:39:47+5:302018-12-02T21:40:34+5:30
जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावरुन धान खरेदी सुरू आहे. मात्र या दोन्ही केंद्रावर अद्यापही खरेदीसाठी पुरेसा बारदाणा उपलब्ध करुन देण्यात आला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावरुन धान खरेदी सुरू आहे. मात्र या दोन्ही केंद्रावर अद्यापही खरेदीसाठी पुरेसा बारदाणा उपलब्ध करुन देण्यात आला नाही. तर धानाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना महिनाभराचा कालावधी लोटूनही चुकारे देण्यात आले नाही. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे या दोन्ही समस्या त्वरीत मार्गी लावण्यात याव्या अन्यथा १२ डिसेंबरला चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा सडक अर्जुन तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
या वेळी दिलेल्या निवेदनातून शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना सात दिवसात चुकारे देण्याचा नियम आहे. मात्र धानाची विक्री करुन महिनाभराचा कालावधी लोटला तरी सडक अर्जुनी तालुक्यातील शेतकऱ्यांना धानाचे चुकारे मिळाले नाही. तर बऱ्याच धान खरेदी केंद्रावर अद्यापही बारदाणा उपलब्ध करुन देण्यात आला नाही.
परिणामी शेतकºयांना गरजेपोटी १५ रुपयांचा बारदाणा २५ रुपयाला घेवून धान विक्रीसाठी न्यावा लागत असल्याचे चित्र आहे.आधीच नैसर्गिक संकटाने खचलेल्या शेतकºयांना शासनाच्या कृत्रिम संकटाना तोंड द्यावे लागत आहे. तर चुकारे उशीरा मिळत असल्याने काही शेतकरी गरजेपोटी खासगी व्यापाºयांना धानाची विक्री करीत आहे. यामुळे त्यांना प्रती क्विंटल पाचशे रुपये नुकसान व बोनसला देखील मुकावे लागत आहे. शासनाने यासर्व गोष्टींची दखल घेवून सर्व धान खरेदी केंद्रावर बारदाणा उपलब्ध करुन देवून धानाचे चुकारे सात दिवसाच्या आत द्यावे. अन्यथा या विरोधात १२ डिसेंबरला चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. अविनाश काशिवार यांनी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
शिष्टमंडळात जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे, जि.प.सदस्य रमेश चुऱ्हे, रजनी गिऱ्हेपुंजे, इंदूताई परशुरामकर, मंजू डोंगरवार, सुधाकर पंधरे, दिनेश कोरे, नरेश भेंडारकर, परसराम राऊत, एफ.आर.टी शहा, शिवाजी गहाणे, नरेश चव्हाण, पुष्पमाला बडोले यांचा समावेश होता.