रुग्णांना चांगल्याप्रकारची सेवा उपलबब्ध करून द्या ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:23 AM2021-05-03T04:23:24+5:302021-05-03T04:23:24+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहून रुग्णांना चांगल्या प्रकारची ...
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहून रुग्णांना चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात शनिवारी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. आमदार विनोद अग्रवाल, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे
यांची उपस्थिती होती. बनसोडे म्हणाले, रुग्णांची गैरसोय होणार नाही यासाठी जिल्ह्यातील बेडची संख्या वाढविण्यात यावी. ऑक्सिजन प्लांटची व्यवस्था करण्यात यावी. औषधांची आवश्यकता असेल तर त्वरित मागणी करा, जेणेकरून रुग्णांची गैरसोय होणार नाही. कोविड केअर सेंटरवर योग्य त्या सोई-सुविधा उपलब्ध करून द्यावे. शासनाकडून कोणत्याही निधीची कमतरता नाही, त्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर व रेमडेसिविर इंजेक्शनची सुविधा उपलब्ध करून द्यावी. गावागावामध्ये
आरोग्य विभागामार्फत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात यावे. खाजगी रुग्णालयाचे नियमित ऑडिट झाले पाहिजे. जिल्ह्यात ऑक्सिजनची उपलब्धता काय आहे याबाबत विचारणा करण्यात आली. ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावला जाणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. शासनाकडे रेमडेसिविर इंजेक्शनच्या पुरवठ्याची कमतरता नाही, त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शन मागणीप्रमाणे वाटप करण्यात यावे. आमदार विनोद अग्रवाल यांनी टेस्टिंग वाढविल्या पाहिजे, जनरल सर्व्हे करण्याची आवश्यकता आहे. सात-सात दिवस आरटीपीसीआर रिपोर्ट येत नाही याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. आमदार चंद्रिकापुरे म्हणाले, रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी रुग्णालयामध्ये मनुष्यबळ भरण्यात यावे, असे सांगितले. माजी आमदार राजेंद्र जैन म्हणाले, ग्रामीण भागात सॅनिटायझर फवारणी झाली पाहिजे. तसेच ग्रामीण भागातील रुग्णालयात औषधांची व्यवस्था करण्यात यावी. जास्तीत जास्त रेमडेसिविर इंजेक्शन गोंदिया जिल्ह्याला मिळाले पाहिजे, असे सांगितले. जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपजिल्हाधिकारी सचिन गोसावी, न.प. मुख्याधिकारी करण चव्हाण,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, जिल्हा
शल्यचिकित्सक यांचे प्रतिनिधी डॉ. प्रशांत तुरकर, अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी संदीप नरवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी
देवराव वानखेडे, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसीलदार आदेश डफळ, अपर तहसीलदार अनिल खडतकर, जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर उपस्थित होते.
......
चोख बंदोबस्त ठेवा
पोलीस यंत्रणेने लॉकडाऊन संचारबंदीमध्ये चोख बंदोबस्त ठेवावा. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने काय पूर्वतयारी केली आहे याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर जिल्हाधिकारी मीना यांनी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हा प्रशासनाची पूर्वतयारीबाबतचे नियोजन विस्तृतपणे सांगितले.