शासकीय धान खरेदी केंद्राकरीता जागा उपलब्ध करुन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:21 AM2021-06-18T04:21:01+5:302021-06-18T04:21:01+5:30
केशोरी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इळदा येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र उशिरा का होईना सुरु झाले. या खरेदी ...
केशोरी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इळदा येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र उशिरा का होईना सुरु झाले. या खरेदी केंद्रावरील गोदाम खरीप हंगामातील खरेदी केलेल्या हाऊसफुल आहेत. पर्याय म्हणून रब्बी हंगामातील धान खरेदी झालेली शासकीय आश्रम शाळा इमारत आणि जि.प.शाळा इमारतीमध्ये ठेवण्यात आली आहेत. या दोन्ही इमारती हाऊसफुल झाल्यामुळे शेतकऱ्यांजवळील धान खरेदी करावा कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी जागेअभावी धान खरेदी खोळंबण्याची शक्यता आहे.
जिल्हा प्रशासनाने खरेदी केंद्र कार्यक्षेत्रात असलेल्या इतर इमारती उपलब्ध करुन देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाने विविध कार्यकारी संस्था इळदा मार्फत रब्बी हंगामातील उन्हाळी धान खरेदी केंद्र ६ जून पासून सुरु केले आहे. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील धानाची उचल न झाल्यामुळे संस्थाचे गोडाऊन पूर्णपणे भरलेली आहेत. पर्याय व्यवस्था म्हणून शासकीय आश्रम आणि जि.प.शाळा इमारत उन्हाळी धान खरेदी करीता उपलब्ध करुन देण्यात आली होती. १६ जूनपर्यंत ५००० क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. दोन्ही इमारती भरल्यामुळे १७ जून पासून आधारभूत धान खरेदी केंद्र बंद करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आली आहेत. शेतकऱ्यांचे धान्य भरलेली ट्रॅक्टर शासकीय खरेदी केंद्र परिसरात उभी आहेत. दररोज येणाऱ्या मृगाच्या पावसामुळे शेतकऱ्यांची धान्य खराब होण्याची शक्यता आहे. नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी ४० टक्के शेतकऱ्यांची धान खरेदी करण्यात आली आहेत. उर्वरीत ६० टक्के शेतकऱ्यांची धान खरेदी करणे बाकी आहे.
.....
७ हजार क्विंटल धान खरेदीची अपेक्षा
रब्बी हंगामात ७ हजार क्विंटल धानाची खरेदी होणे अपेक्षित आहे. खरेदी केंद्राच्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद शाळा अरततोंडी, जुनेवाणी, परसटोला आणि प्रगती हायस्कूल इळदा, केवळराम हायस्कूल परसटोला येथील जिल्हा प्रशासनाने इमारती उपलब्ध करुन दिल्यास उर्वरीत शेतकऱ्यांचे धान्य खरेदी करणे शक्य असल्याचे आधारभूत धान खरेदी केंद्राच्या व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. या प्रमुख बाबींची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेवून तत्काळ इमारत उपलब्ध करुन देण्याची मागणी इळदा येथील शेतकऱ्यांनी केली आहे.