पं.स. कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 09:54 PM2018-05-12T21:54:12+5:302018-05-12T21:54:20+5:30
तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत रोजगार हमी योजनेचे काम सुरळीतपणे करीत असतानाही पंचायत समितीमधील काही पदाधिकारी व सदस्य या कर्मचाऱ्यांना पैशांची मागणी करून अश्लील शिवीगाळ करून मारहाणीची धमकी देतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत रोजगार हमी योजनेचे काम सुरळीतपणे करीत असतानाही पंचायत समितीमधील काही पदाधिकारी व सदस्य या कर्मचाऱ्यांना पैशांची मागणी करून अश्लील शिवीगाळ करून मारहाणीची धमकी देतात. नेहमीचा हा प्रकार झाला असून यावर तोडगा निघावा यासाठी रोजगार हमी योजनेचे काम बघणाऱ्या पंचायत समितीमधील १९ कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून (दि.११) बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
कर्मचाºयांनी दिलेल्या निवेदनानुसार,संपूर्ण राज्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुका हा अग्रेसर आहे. या योजनेचे काम पाहण्याकरीता पंचायत समितीमध्ये फक्त १९ कर्मचारी असून तेही कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. या तालुक्यात विविध ग्रामपंचायतमध्ये रोहयोच्या कामावर पाच हजार मजूर कार्यरत आहेत. असे असतानाही पंचायत समिती मधील उपसभापती व सदस्य कर्मचाºयांच्या कक्षात जाऊन त्यांना पैशांची मागणी करीत असल्याचा आरोप केला आहे.
पैसे न दिल्यास आई, बहीण, पत्नीच्या नावाने अश्लील शब्दात शिवीगाळ करतात आणि मारझोड करण्याची धमकी देत असल्याचे तक्रारीत म्हटले. या नेहमीच्या मानसिक त्रासाला कंटाळून शुक्रवारपासून (दि.११) या योजनेत काम करणाºया सर्व १९ कंत्राटी कर्मचाºयांनी पंचायत समिती समोर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनासंदर्भात आंदोलन करीत असलेल्या १९ कर्मचाऱ्यांनी गटविकास अधिकारी मनोज हिरोळकर आणि जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्यासह संबंधीत सर्व अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन या प्रकरणी न्याय मिळवून देण्याची व दोषी पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कर्मचारी कामबंद आंदोलन करीत असल्याची माहिती पंचायत समिती सदस्य अर्चना ताराम व संगीता भेलावे यांना मिळताच त्यांनी लगेच या आंदोलनास्थळी भेट दिली. आंदोलनावर गेलेल्या कर्मचाºयांच्या समस्या जाणून घेतल्या. पंचायत समिती पदाधिकाऱ्यांकडून या कर्मचाऱ्यांना होत असलेल्या मानसिक त्रासाबाबद खेद व्यक्त करुन त्यांच्या मागणीला ताराम व भेलावे यांनी आपले समर्थन दिले.
या आंदोलनामुळे मग्रारोह योजनेतील कामावर असणाऱ्या मजुरांचे हजेरी पत्रक काढणे आणि नवीन कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम बंद पडल्याने तालुक्यात रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या पाच हजार मजुरांवर रोजगारापासून वंचित होण्याची वेळ आली आहे.
आंदोलनात सहाय्यक कार्यक्रम अधिकारी गौतम साखरे, राजेश कापगते, जी. टी. पारधी, एस. एस. वलथरे, ए. एस. दाते, जे. एस. रहांगडाले, संजय डोये, मनोज बोपचे, निलेश वगारे, भुमेश्वर टेंभरे, किशोर ठाकरे, महेश बिसेन, आशिष रहांगडाले, संजय पाथोडे, बन्सोड, एस. एस. वाघमारे, व्ही. आर. बिसेन, हितेश नांदगाये या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले निवेदन
या प्रकरणाबाबद १९ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी देवरीचे गटविकास अधिकारी मनोज हिरोळकर आणि गोंदियाचे जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधीत सर्व अधिकाऱ्यांना आपल्या सहीचे लेखी निवेदन देऊन या प्रकरणात आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.