रस्ता सुरक्षेसाठी जनजागृतीची गरज
By admin | Published: January 12, 2016 01:38 AM2016-01-12T01:38:12+5:302016-01-12T01:38:12+5:30
रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीने शिक्षण आणि अभियांत्रीकीच्या क्षेत्रात अभाव आढळतो.
राजकुमार बडोले : २७ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन
गोंदिया : रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीने शिक्षण आणि अभियांत्रीकीच्या क्षेत्रात अभाव आढळतो. या क्षेत्रातील व्यक्तींनी आपापल्या जबाबदाऱ्या ओळखून जीवित हानी टाळण्यासाठी काम करावे. रस्ता सुरक्षेसाठी जनजागगृती करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय व वाहतूक नियंत्रण शखेच्या संयुक्तवतीने येत्या २४ तारखेपर्यंत चालणाऱ्या २७ व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी रविवारी ते उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातून बोलत होते.
अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार गोपालदास अग्रवाल, आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, माजी आमदार हेमंत पटले, फुलचूरच्या सरपंच उर्मिला दहीकर उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. बडोले यांनी, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अपघात प्रवणस्थळी जिल्हा परिषदेने गतिरोधक तयार करावे. रस्ता सुरक्षेसाठी जिल्ह्यातील संबंधीत यंत्रणांनी अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी. नशा करून कुणीही वाहन चालवू नये. शहरात अतिक्रमणामुळे रस्ते अरूंद झाले असून हे अतिक्रमण हटविण्याच्या कामाकडे लक्ष दिले जाणार असून आवश्यक त्या ठिकाणी सिग्नल लावण्यात येतील. शिवाय विद्यार्थी व नागरिकांना रेल्वे उड्डाण पुल सुरक्षितपणे ओलांडता यावे यासाठी नावीन्यपूर्ण योजनेतून समांतर स्काय वॉक तयार करण्यात येणार असल्याचेही ना. बडोले यांनी सांगीतले.
जि.प.अध्यक्ष मेंढे यांनी, अपघात टाळण्यासाठी दुचाकीचालकाने व मागे बसणाऱ्या व्यक्तीने हेलमेट हेलमेट वापराबाबत सक्ती करावी. तसेच नशा करून कुणीही वाहन चालविणार असा संकल्प करावा असे मत मांडले. आमदार रहांगडाले यांनी, निष्काळजीपणा टाळला तर निश्चितच अपघातांचे प्रमाण कमी होणार असल्याचे म्हटले. तर जिल्हाधिकारी डॉ. सुर्यवंशी यांनी, सुरक्षा विषयक नियमांचे पालन न केल्यास अपघात होतो व प्रसंगी मृत्यूला सामोरे जावे लागते. वाहतुकीचे नियम आपल्या जीवन-मरणाशी संबंधित असल्याचे मत व्यक्त केले.
प्रास्ताविक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नारायण निमजे यांनी मांडले. संचालन अपूर्व अग्रवाल यांनी केले. आभार वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक किशोर धुमाळ यांनी मानले.
कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव, पोलीस उप अधीक्षक सुरेश भवर, उप विभागीय पोलीस अधिकारी, राठोड, आगार प्रमुख गौतम शेंडे, तहसीलदार संजय पवार, पोलीस निरीक्षक सोनवाने व अन्य उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)