सामूहिक औषधोपचार वाटप पोस्टरचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:20 AM2021-07-01T04:20:59+5:302021-07-01T04:20:59+5:30
गोंदिया : हत्तीरोग निर्मूलनाकरिता आरोग्य प्रशासनाच्या माध्यमातून गुरुवारपासून (दि.१) प्रारंभ होत असलेल्या सामूहिक औषधोपचार वाटप पोस्टरचे प्रकाशन जिल्हा परिषदेचे ...
गोंदिया : हत्तीरोग निर्मूलनाकरिता आरोग्य प्रशासनाच्या माध्यमातून गुरुवारपासून (दि.१) प्रारंभ होत असलेल्या सामूहिक औषधोपचार वाटप पोस्टरचे प्रकाशन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गंगाधर परशुरामकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा मलेरिया अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
कोविडच्या पार्श्वभूमीवर घरोघरी जाऊन आशा वर्कर्स हत्तीपाय प्रतिबंधक गोळ्यांचे वाटप करणार आहे. या पोस्टरच्या माध्यमातून ३ बाउल पद्धतीचे प्रात्यक्षिक करून दाखवलेले आहे. म्हणजे गोळी वाटप करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा जनतेशी थेट संपर्क येणार नाही. तसेच ही मोहीम फक्त गोळी वाटप नसून प्रत्यक्ष देखरेखीखाली गोळ्या खाऊ घालणे आहे. याप्रसंगी शहरी वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना डॉ. मोहबे यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कापसे यांनी, हत्तीरोग निर्मूलनासंदर्भात राबविण्यात येत असलेल्या सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेची माहिती दिली.
----------------------------
दोन प्रकारची औषधे देणार
हत्तीरोगाच्या प्रतिबंधाकरिता कृमी नाशक अलबेंडोझोल व हत्तीपायरोग प्रतिबंधक हेटरोझन अशा दोन गोळ्या आरोग्य कर्मचारी आपल्या देखरेखीत पात्र लाभार्थ्यांना घरोघरी जाऊन खाऊ घालणार आहेत. यामध्ये गरोदर माता, २ वर्षांखालील बालके, अतिगंभीर रुग्ण वगळता सर्वांना घरोघरी जाऊन प्रत्यक्ष देखरेखीत औषध खाऊ घालायची आहे. यात कोविड प्रोटोकॉलचे तंतोतंत पालन करून गृहभेटीचे नियोजन केले आहे. तसेच जिल्ह्यातील कोणतीही व्यक्ती औषधोपचारापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत.