केशोरी येथील मुख्य रस्त्यावर तयार झाले डबके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:20 AM2021-07-10T04:20:51+5:302021-07-10T04:20:51+5:30
पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहून न जाता, डांबरीकरण निघालेल्या भागात पाणी साचून राहत असल्यामुळे या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांसह वाहन ...
पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहून न जाता, डांबरीकरण निघालेल्या भागात पाणी साचून राहत असल्यामुळे या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांसह वाहन चालकांना अडचण जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. केशोरी गावामधून अर्जुनी मोरगाव तालुक्याला जाण्यासाठी या एकच मार्गाचा जास्त उपयोग होत असल्याने, रात्रंदिवस या मार्गाने नागरिक तथा वाहने धावत असतात. या रस्त्यावरील डांबरीकरणाचा स्तर उखडून खड्डे पडले आहेत. त्यात पाणी साचून राहत आहे. बऱ्याच कालावधीपर्यंत या खड्ड्यात पाणी साचून राहत असून, त्यापासून चिखल तयार होत आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर चिखल उडून कपडे खराब झाल्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देऊन किमान रस्त्यावर मुरुम टाकून तात्पुरते खड्डे बुजविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
..............