पुजारीटोला धरणाचे 12 दरवाजे उघडले,दिला अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2021 05:00 AM2021-10-03T05:00:00+5:302021-10-03T05:00:07+5:30
शुक्रवारी रात्री मध्य प्रदेशातील संजय सरोवरचे १ गेट उघडण्यात आले. मध्य प्रदेशात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे, तर गोंदिया जिल्ह्यातील देवरी आणि सालेकसा तालुक्यांतसुद्धा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी शनिवारी सकाळी ८ वाजता पुजारीटोला धरणाचे १२ दरवाजे २ फुटांनी उघडण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : लगतच्या मध्य प्रदेश आणि धरण क्षेत्रात शुक्रवारी जोरदार पाऊस झाला, तर शनिवारीसुद्धा या भागात पावसाचा जोर कायम असल्याने सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाचे १२ आणि देवरी तालुक्यातील सिरपूर धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
शुक्रवारी रात्री मध्य प्रदेशातील संजय सरोवरचे १ गेट उघडण्यात आले. मध्य प्रदेशात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे, तर गोंदिया जिल्ह्यातील देवरी आणि सालेकसा तालुक्यांतसुद्धा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी शनिवारी सकाळी ८ वाजता पुजारीटोला धरणाचे १२ दरवाजे २ फुटांनी उघडण्यात आले. त्यामुळे या धरणातून क्युमेक्स ५६७.८१ म्हणजे २००५२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. पुजारीटोला धरण यंदा १०० टक्के भरले आहे, तर देवरी तालुक्यातील सिरपूर जलाशयाचेसुद्धा सात दरवाजे उघडण्यात आले. ३ दरवाजे १ फुटाने, तर ४ दरवाजे २ फुटाने उघडण्यात आले असून, यातून १०००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. संजय सराेवर, पुजारीटोला आणि सिरपूर धरणाचे दरवाजे उघडल्याने बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
त्यामुळे नदीकाठलगतच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने दिला आहे.
पाणीटंचाईचे संकट टळले
- जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात दमदार पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. बहुतेक धरणांमध्ये ७० टक्केच्या वर पाणीसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्यावरील पाणीटंचाईचे संकट टळले आहे. खरिपातील धान निघण्याच्या मार्गावर असल्याने यंदा रब्बीसाठी मोठ्या प्रमाणात सिंचन प्रकल्पामध्ये पाणीसाठा उपलब्ध राहण्याची शक्यता आहे.