पितृपंधरवड्यात भोपळा खातोय भाव; मंडीत ३० तर घराजवळ ४० रुपये किलो !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:30 AM2021-09-25T04:30:56+5:302021-09-25T04:30:56+5:30
कपिल केकत गोंदिया : लाडक्या बाप्पाला निरोप दिल्यानंतर आता पितृपक्षाला सुरुवात झाली आहे. पितृपक्षात भोपळा, गवार व कारल्यांना मान ...
कपिल केकत
गोंदिया : लाडक्या बाप्पाला निरोप दिल्यानंतर आता पितृपक्षाला सुरुवात झाली आहे. पितृपक्षात भोपळा, गवार व कारल्यांना मान राहत असल्याने सध्या त्यांना तेजी आली आहे. यंदा पावसामुळे पिकांचे नुकसान झाले तर कधी ऊन व अचानक पाऊस वाढल्याने भाजीपाला खराब होऊ लागला आहे. यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली असून मागणीही वाढल्याने सर्वच भाज्या तेजीत आल्या आहेत. गणेशोत्सव व महालक्ष्मीचा अनेक ठिकाणी महाप्रसाद झाल्याने भाजीपाल्याची मागणी वाढली व परिणामी त्यांचे दरही वाढले आहेत. यात विशेष म्हणजे, आता पितृपक्षात भोपळा भाव खात असून बाजारात ३० रुपये तर घराजवळ याच भोपळ्याची ४० रुपये किलो दराने विक्री होत आहे.
-----------------------------
१) भाजीपाल्याचे भाव (प्रतिकिलो)
भाजीपाला बाजारातील दर घराजवळ
भोपळा - ३० -४०
गवार- ६०-८०
कारली-५०-८०
वांगी- ५० -६०
चवळी शेंग- ७०-८०
बीन्स- ७०-८०
टोमॅटो-२०-३०
बटाटे- २०-२०
फ्लॉवर-५०-६०
सिमला-७०-८०
------------------------------------
मागणी वाढली...
१) आता नुकताच गणेशोत्सव सरला असून त्यातच महालक्ष्मी आटोपल्या आहेत. यात महाप्रसादाचे आयोजन होत असल्याने भाजीपाल्याला मागणी वाढली.
२) परिणामी भाजीपाल्याचे दर वधारले असून शिवाय, पावसामुळे भाजीपाला खराब झाल्यानेही त्यांचा पुरवठा कमी होत आहे.
३) कधी पाऊस तर कधी ऊन अशा या वातावरणाने भाजीपाल्याची नासाडी झाली. त्यात आता पितृपक्षात भाजीपाल्याला मागणी वाढल्याने त्यांचे दरही वाढले आहेत.
-----------------------------
व्यापारी काय म्हणतात ?
यंदा जेव्हा पावसाची गरज होती तेव्हा पाऊस आला नाही. आता एवढा पाऊस येत आहे की, त्यामुळे भाजीपाला खराब होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यात सणवार असल्याने भाजीपाला लागतोच. परिणामी भाजीपाल्याचा पुरवठा कमी व मागणी असल्याने जर चढले आहेत.
-राजू देशमुख
---------------------------
पावसामुळे भाजीपाला खराब होत आहे. यामुळे बाजारात भाजीपाल्याचा पुरवठा कमी झाला आहे; मात्र सणवाराचे दिवस सुरू आहेत. त्यात पितृपक्षाला भाजीपाला लागतोच व लोकांना खरेदी करावाच लागतो. अशात आता दर चढले असले तरीही भाजीपाला घ्यावाच लागेल. आम्हालाही चढ्या दराने खरेदी करावा लागत आहे.
-महेश भगत
------------------------------
अर्धा-एक किलोसाठी बाजारात कोण जाणार ?
घरात कधी-कधी अचानकच भाजीपाला लागल्यास घराजवळून घेता येतो. तेथे नक्कीच काही पैसे वाढवूनच खरेदी करावा लागतो. मात्र अर्धा-एक किलोसाठी बाजारात जाणे परवडत नाही. बाजारात गेल्यास पेट्रोलही लागणार व तेही १०० रुपयांच्या वर गेले आहे. सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत.
- ममता कावडे
------------------------------
दररोजच्या स्वयंपाकात कधी-कधी अचानक भाजीपाला लागल्यास जवळूनच खरेदी करते. येथील भाजी विक्रेता बाजारपेक्षा जास्त पैसे घेतोच. मात्र थोडाफार भाजीपाला खरेदी करण्यासाठी बाजारात जाणेही परवडत नाही. आता पेट्रोल महागले असून तेही परवडणारे राहिले नाही.
- सविता डोये