पेन्शनअभावी पुंगळे कुटुंबीयांची वणवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 11:27 PM2019-07-28T23:27:44+5:302019-07-28T23:28:27+5:30
जिथे विद्यार्थी काय गावातही अ, आ,ई ची जाण नव्हती तिथे विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांना अक्षर साक्षर केले. तब्बल १३ वर्षे शासनाची खाल मानेने चाकरी केली पण आज त्यांच्या कुटूंबीयावर कठीन वेळ आली असताना शासन चक्क हातवर करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वडेगाव : जिथे विद्यार्थी काय गावातही अ, आ,ई ची जाण नव्हती तिथे विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांना अक्षर साक्षर केले. तब्बल १३ वर्षे शासनाची खाल मानेने चाकरी केली पण आज त्यांच्या कुटूंबीयावर कठीन वेळ आली असताना शासन चक्क हातवर करीत आहे.
ही घटना आहे एका शासकीय कर्मचाऱ्यांच्या निराधार झालेल्या कुटूंबाची, पतीच्या निधनानंतर शासनानेही हात झटकल्याने कुटूंबीयांना हक्काचे गाव सोडून वणवण भटकावे लागत आहे. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील मशीटोला येथील मृत कर्मचारी भोजराज गोमा पुंगळे यांच्या कुटूंबाची ही व्यथा आहे. कर्मचारी भोजराज पुंगळे यांनी त्यांच्या हयातीत वेठबिगारालाही लाजवेल असे कष्ट उपसून गावात अक्षराची पेरणी केली.आयुष्याच्या उमेदीच्या काळात ब्र न काढता शासनाची चाकरी केली पण वयाच्या ३८ व्या वर्षी अचानक त्यांचे निधन झाले.सारच बिनसले भोजराज पुंगळे यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी शालू पुंगळे, सात वर्षाचा मुलगा हर्ष व तीन वर्षीय पूजा यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे.
पुंगळे यांनी काही दिवस मशीटोला येथे काम करुन दिवस काढले पण कुणाचीच मदत न मिळल्याने कधी कुण्या ओळखीच्या गावात तर आता माहेरी त्यांनी आसरा घेतला आहे.
मृत कर्मचारी पुंगळे यांच्या वेतनातून सुमारे १ लाख ३२ हजार रुपयांची अंशदायी पेंशनची कपात करण्यात आली होती. गटविमा व इतरही कपाती करण्यात आल्या. परंतु शासनाकडून त्यांना आजवर कुठलीच मदत मिळालेली नाही.
शासकीय कर्मचाºयांस त्याच्या सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास १० लक्ष रुपये अनुदान देण्याचे आदेश आहेत. परंतु याचीही जाण विभागाला व शासनाला नाही. पुंगळे यांच्या पत्नी शालू पुंगळे या एएनएम व पदवीपर्यंत शिकलेल्या आहेत.तीन वर्षीय मुलीला सांभाळ करतानाच मुलाला शिक्षण देण्याचे काम त्या कष्ट उपसून करीत आहेत.
तरी भविष्याच्या प्रश्न त्यांच्यापुढे आ वासून उभा आहे. शासकीय कर्मचाºयांच्या कुटूंबाची अशी दूरवस्था होत असेल तर भविष्यात कर्तव्यदक्ष युवक शासकीय नोकरीकडे पाठ दाखवतील यात दुमत नसावे.
अनुकंपा तत्त्वावर नोकरी द्या
पतीच्या निधनाने आपले कुटूंब वणवण भटकत असून उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. आपण नर्सिंग पदवी शिक्षीत असल्यामुळ अनुकंपा तत्त्वावर नोकरी व जुनी पेंशन लागू करण्यात यावी.
- शालू पुंगळे, मृतकाची पत्नी.