जिल्ह्यात आतापर्यंत १६ लाख क्विंटल धान खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 10:38 PM2019-01-25T22:38:28+5:302019-01-25T22:39:13+5:30
यंदा सुरूवातीला पावसाने चांगलीच साथ दिल्याने जिल्ह्यात भरघोस धान पीक झाले आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत १६ लाख ६० हजार २२९ क्विंटल धान खरेदी झाली आहे. यात मार्केटींग फेडरेशनने १० लाख ५७ हजार २९६ क्विंटल धान खरेदी केली आहे.
कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : यंदा सुरूवातीला पावसाने चांगलीच साथ दिल्याने जिल्ह्यात भरघोस धान पीक झाले आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत १६ लाख ६० हजार २२९ क्विंटल धान खरेदी झाली आहे. यात मार्केटींग फेडरेशनने १० लाख ५७ हजार २९६ क्विंटल धान खरेदी केली आहे. तर आदिवासी विकास महामंडळाने ६ लाख २ हजार ९३३ क्विंटल धान खरेदी केली आहे.
जिल्ह्याची ‘धानाचे कोठार’ अशी ख्याती आहे. कारण जिल्हयात धान पीक हेच प्रमुख पीक म्हणून घेतले जाते. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी धानाचीच शेती करीत असून सर्वाधीक धानाचेच उत्पादन जिल्ह्यात होते. मात्र आजही बहुतांश शेतकरी वरथेंबी पाण्यावर आपली शेती फुलवित आहे. यामुळे निसर्गाच्या मर्जीवरच जिल्ह्यातील शेती फुलत असल्याची येथील वास्तवीकता आहे. हेच कारण आहे की, मागील काही वर्षांपासन पावसाच्या लहरीपणामुळे धानाचे उत्पादन झाले नाही व शेतकरी अडचणीत आला होता.
यंदा मात्र सुरूवातीला पावसाने चांगली साथ दिली व शेतकरी धान पीक घेवू शकला. पाहिजे त्या प्रमाणात पाऊस मिळाल्यामुळे जिल्ह्यात यंदा भरभरून धानाचे उत्पादन झाल्याचे दिसून येत आहे.
हेच कारण आहे की, जिल्ह्यात आतापर्यंत १६ लाख ६० हजार २२९ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे.
यात मार्के टींग फेडरेशनने १० लाख ५७ हजार २९६ क्विंटल धान खरेदी केली आहे. तर आदिवासी विकास महामंडळाने ६ लाख २ हजार ९३३ क्विंटल धान खरेदी केली आहे.
मार्च पर्यंत होणार धान खरेदी
जिल्ह्यात मार्केटींग फेडरेशन ५७ केंद्रांच्या माध्यमातून तर आदिवासी विकास महामंडळ ४३ केद्रांच्या माध्यमातून धान खरेदी करते. अशात आतापर्यंत दोघांनी मिळून १६ लाख ६० हजार २२९ क्विंटल धान खरेदी केली आहे. मात्र मार्च अखेरपर्यंत धान खरेदी केली जाणार असल्याने धान खरेदीची ही आकडेवारी आणखीही वाढणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात यंदा मागील वर्षांच्या तुलनेत भक्कम धान खरेदी होणार असल्याचे दिसत आहे.
भाव वाढीच्या आशेने विक्री थांबली
शेजारच्या मध्यप्रदेश राज्यात कॉँग्रेस सरकार सत्तेत येताच त्यांनी धानाला २५०० हजार रूपये हमीभाव जाहीर केला आहे. त्यापाठोपाठ आपल्या राज्यातील विरोधी पक्षातील नेतेही धानाला २५०० रूपये भाव द्यावा ही मागणी रेटून धरत आहे. अशात राज्यातही धानाला २५०० भाव जाहीर झाल्यास आताच विक्री करून नुकसानीत जाण्यापेक्षा शेतकऱ्यांनी धान विक्री थांबविल्याचे बोलले जात आहे. मात्र मार्च पर्यंत केंद्र सुरू राहणार असल्याने नक्कीच धान खरेदीत भर पडणार असल्याचे बोलले जात आहे.