फुलचूर-फुलचुरटोलाला लवकरच शुद्ध पाण्याचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:38 AM2018-12-01T00:38:51+5:302018-12-01T00:39:52+5:30
शहरालगत असलेल्या फुलचूर-फुलचुरटोला गावाला शहरासारख्याच सुविधा उपलब्ध करुन देऊन विकास करण्याचा आपला मानस आहे. ज्याप्रमाणे काँग्रेस सरकारच्या काळात कुडवा-कंटगी या गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरालगत असलेल्या फुलचूर-फुलचुरटोला गावाला शहरासारख्याच सुविधा उपलब्ध करुन देऊन विकास करण्याचा आपला मानस आहे. ज्याप्रमाणे काँग्रेस सरकारच्या काळात कुडवा-कंटगी या गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली. तशीच योजना फुलचूर-फुलचुरटोला या गावासाठी मंजूर करुन शुध्द पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आ.गोपालदास अग्रवाल यांनी सांगितले.
पाठक कॉलनी फुलचुरटोला ते आंबाटोली फुलचूर रस्ता डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, जि.प.आरोग्य व शिक्षण सभापती रमेश अंबुले, लता दोनोडे, पं. स. सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, माजी सभापती स्रेहा गौतम, योगराज उपराडे, सरपंच पुष्पलता मेश्राम, उपरसंपच जीवन बन्सोड, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रकाश रहमतकर, माजी सरपंच उर्मिला दहीकर, श्याम कावळे, इंदिरा कटरे, दिनेश तिडके, गंगाराम बावनकर, राजा बैस, रवी बोदानी, निशा उईके, अर्चना राऊत, उपमा पशिने, अशोक लिचडे, अशोक ईटानकर, मनिष गौतम, देवचंद बिसेन, दुर्गाप्रसाद नागपुरे, सुनिता सव्वालाखे, सत्यभामा कवास, राजेश कटरे उपस्थित होते.
अग्रवाल म्हणाले फुलचूर परिसरात तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू झाल्याने जिल्हाभरातील विद्यार्थी येथे शिकण्यासाठी येत आहे. यामुळे परिसरातील उद्योगाला चालना मिळण्यास मदत झाली. भविष्यात तंत्रनिकेतन महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करुन विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याचा आपला मानस असल्याचे सांगितले. सीमा मडावी म्हणाल्या फुलचूर-फुलचुरटोला परिसराचा झालेला विकास हे आ. अग्रवाल यांच्याच प्रयत्नांचे प्रतीक आहे.
तंत्रनिकेतन महाविद्यालय व बायपास मार्ग तयार करुन या परिसराचा चेहरा मोहरा बदलविण्याचे काम त्यांनी केल्याचे सांगितले. आ. अग्रवाल यांच्या माध्यमातून या परिसरात विविध कामे करण्यात आल्याने नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यास मदत झाली. तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष व सभापती सुध्दा याच गावातून करुन अग्रवाल यांनी या गावाचे महत्त्व वाढविल्याचे सांगितले.