ग्रामीण व शहरी भागाचा विकास हाच ‘नाबार्ड’चा उद्देश
By Admin | Published: March 2, 2017 12:16 AM2017-03-02T00:16:51+5:302017-03-02T00:16:51+5:30
बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागाचा विकास करणे हा नाबार्ड फायनांसचा (नॅब्फीन्स) उद्देश आहे.
बी.एस.सुरान : आढावा बैठक बचत गटांचे माध्यम
गोंदिया : बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागाचा विकास करणे हा नाबार्ड फायनांसचा (नॅब्फीन्स) उद्देश आहे. यासाठी स्वयं सहायता बचत गटांना नाबार्ड कर्ज पुरवठा करीत आहे, असे मार्गदर्शन नाबार्ड फायनांसशियल सर्व्हिसेस लि.चे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. बी.एस. सुरान यांनी केले.
ते इंडियन वेलफेयर सोसायटी गोंदिया येथे आढावा बैठकीत बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने नाबार्डचे जनरल मॅनेजर ओ.पी. धोंडीयाल, डेप्युटी जनरल मॅनेजर मनोज चालाख, इंडियन सोशल वेलफेयर सोसायटीचे संचालक अशोक बेलेकर, जिल्हा व्यवस्थापक त्र्यंबक मंगर उपस्थित होते.
डॉ. सुरान पुढे म्हणाले, नॅब्फीन्स ही रिझर्व बँक आॅफ इंडिया कायदा १९३४ अन्वये एनबीएफसी एमएफआय म्हणून नोंदणीकृत आहे. नाबार्ड फायानांसचे व्याज दर १५.५० टक्के ते १६.९० टक्के असे असून उर्वरित बाकी रकमेवर असतो. नॅब्फीन्सचा मुख्य उद्देश्य नफा कमविणे हा नसून स्वयं सहायता समुहाच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील ज्या गरजू कुटुंबांना आर्थिक सहाय्य मिळत नाही, अशा लोकांना घरपोच वित्तीय सेवा पुरविणे व भांडवल उपलब्ध करून देणे, हा आहे. मात्र नाबार्ड फायनांसचे कर्ज कोणत्याही प्रकारे सुट व माफ नाही. बचत गटांनी घेतलेले कर्ज परतफेड करावे लागेल. बचत गटांनी घेतलेले कर्ज नियमित मासिक परतफेड केल्यानंतर पुढील कर्ज सहजरित्या मिळते, असे सांगितले.
या वेळी अशोक बेलेकर यांनी प्रगती अहवाल सादर केला. एकूण ६८२ बचत गटांना २१ कोटी ४४ लाख रूपये संस्थेच्या माध्यमातून कर्ज वाटप करण्यात आले. नॅब्फीन्सने बचत गटांना दिलेल्या कर्जाच्या माध्यमातून महिलांनी कर्जाचा वापर मुलामुलींच्या शिक्षणासाठी, शौचालय बांधकामासाठी, व्यवसाय करण्यासाठी, घर बांधकामासाठी, शेतात बोअरवेल करण्यासाठी, शेतीकरिता अशा अनेक कामांसाठी करून जीवनमान उंचाविण्याचा प्रयत्न केला जावू शकतो, असे सांगितले.
संचालन जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर पटले यांनी केले. आभार गजेंद्र मेश्राम यांनी मानले. बैठकीला इंडियन सोशल वेलफेयर सोसायटीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)