उत्तम आरोग्यासाठी आपले छंद जोपासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:36 AM2021-06-09T04:36:39+5:302021-06-09T04:36:39+5:30
गोंदिया : कोरोनामुळे आज शारीरिक व मानसिक समस्या उद्भवत आहेत. अशात मात्र उत्तम आरोग्यासाठी योगा, प्राणायाम, पुरेशी झोप, सकस ...
गोंदिया : कोरोनामुळे आज शारीरिक व मानसिक समस्या उद्भवत आहेत. अशात मात्र उत्तम आरोग्यासाठी योगा, प्राणायाम, पुरेशी झोप, सकस आहार व उत्तम रोजनिशी अवलंबिल्यासह आपले छंद जोपासावे, असा सल्ला मानसशास्त्रज्ञ व नागपूर येथील एलएडी महाविद्यालयाच्या रिमा सिद्धू यांनी दिला.
येथील डीबीएम एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित गोंदिया पब्लिक स्कूलच्या वतीने ‘कोरोना महामारी संकटात स्वस्थ कसे राहाल’ या विषयावर विद्यार्थी व पालकांसाठी आयोजित दोन दिवसीय वेबिनारमध्ये त्या बोलत होत्या. संस्था सचिव इंदिरा सपाटे यांच्या अध्यक्षतेत आयोजित या वेबिनारला प्राचार्य जितेंद्र तलरेजा,उपप्राचार्य रिता अग्रवाल, हायस्कूल विभाग प्रभारी महेश गौर, माध्यमिक विभाग प्रभारी शेखर बिंधानी, ज्योती जगदाळे प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना सिद्धू यांनी, मानसिक ताण येणे ही सामान्य प्रक्रिया असून, मानसिक आरोग्यासाठी ध्यास लावणे, प्रसार माध्यमांचा योग्य वापर करणे तसेच कोरोना संबंधित विश्वसनीय माध्यमातूनच माहिती मिळविणे आवश्यक आहे, तर डॉ. सपाटे यांनी, स्वस्थ शरीरात स्वस्थ मनाचा वास असतो. करिता कोरोना संकट काळात आपल्याला शारीरिक व मानसिक दोन्ही प्रकारे स्वस्थ राहणे आवश्यक आहे, असे सांगितले. संचालन बिधांनी यांनी केले. आभार जगदाळे यांनी मानले.
----------------------
आपल्या मुलांचे मित्र बना
मुलांची मानसिक स्थिती लक्षात घेत पालकांनी पाल्यांशी खुली चर्चा करावी, त्यांचे ऑनलाइन वर्ग व अभ्यासासाठी नेहमीच तत्पर असावे, त्यांच्या कामाची प्रशंसा करावी व मित्रासारखा व्यवहार करावा. तसेच मुलांनी आपली वैयक्तिक रोजनिशी लिहावी जेणेकरून त्यांचे मानसिक स्वास्थ संतुलित राहणार, असे सिद्धू यांनी सांगीतले. दरम्यान, त्यांनी पालकांच्या शंकांचेही समाधान केले.