साधारण रूग्णांना घरीच क्वारंटाईन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 05:00 AM2020-08-19T05:00:00+5:302020-08-19T05:00:02+5:30
आजघडीला कोरोना व्यतिरिक्त अन्य आजारांचा उपचार लगभग बंद झाला आहे. यामुळे गरिब रूग्णांचे हाल होत आहेत. कित्येकांना बेड मिळत नसल्याने जमिनीवर ठेऊन उपचार केला जात आहे. त्यामुळे केटीएस रूग्णालयातील ओपीडीवरील नवीन वॉर्डात कोरोना बाधित नसलेल्या रूग्णांच्या उपाचाराची व्यवस्था करावी अशी मागणीही अग्रवाल यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना रूग्णांची सातत्याने वाढत चाललेली संख्या गंभीर बाब आहे. त्यातल्या त्यात शासकीय रूग्णालय व क्वारंटाईन सेंटरमधील अव्यवस्थेचे व्हिडिओ प्रामुख्याने वायरल होत आहे. या अव्यवस्थेमुळे सामान्य नागरिक तपासणीपासून वाचत आहे तेथेच क्वारंटाईन सेंटरमध्ये जाण्यासाठी पुरजोर विरोध होत आहे. अशात साधारण परिस्थिती (असिम्टोमेटीक) असलेल्या रूग्णांना घरातच क्वारंटाईन करा अशी मागणी माजी आमदार गोपालदास अग्रवाल व नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी केली. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन या विषयांवर चर्चा केली.
चर्चेत अग्रवाल यांनी, अव्यवस्थेचे चित्र दररोज पुढे येत असताना आरोग्य प्रशासन फक्त पुरवठादारांकडून मशीन खरेदी करणे व जेवणाचे कंत्राट आपल्या माणसांना देण्याचे काम करीत आहे. आयसीएमआरने असिम्टोमेटीक कोरोना रूग्णांना घरीच क्वारंटाईन करण्याचे नवीन निर्देश आहे. मात्र जिल्ह्यात अद्याप हे लागू करण्यात आले नाहीत. अशात जिल्ह्यातही साधारण रूग्णांना घरातच क्वारंटाईन करण्याची सूट द्यावी जेणेकरून शासकीय क्वारंटाईन सेंटरवरील बोजा कमी होऊन व्याप्त असुविधांपासून रूग्णांची सुटका होणार असे सूचविले.
तसेच, आजघडीला कोरोना व्यतिरिक्त अन्य आजारांचा उपचार लगभग बंद झाला आहे. यामुळे गरिब रूग्णांचे हात होत आहेत. कित्येकांना बेड मिळत नसल्याने जमिनीवर ठेऊन उपचार केला जात आहे. त्यामुळे केटीएस रूग्णालयातील ओपीडीवरील नवीन वॉर्डात कोरोना बाधित नसलेल्या रूग्णांच्या उपाचाराची व्यवस्था करावी अशी मागणीही अग्रवाल यांनी केली. यावर डॉ. बलकवडे यांनी, सर्व विषयांवर गांभीर्याने लक्ष देत त्यावर त्वरीत कारवाईचे निर्देश दिले.
सीटी स्कॅन मशीन त्वरीत सुरू करा
याप्रसंगी अग्रवाल यांनी, रूग्णालयातील सीटी स्कॅन मशीन मागील ६ महिन्यांपासून बंद पडून असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात येत आहेत. सीटी स्कॅन मशीनसाठी आम्ही तीन कोटी रूपयांचा निधी मिळवून दिला होता व माहितीनुसार नवीन मशीन रूग्णालयात आली आहे. मात्र ती मशीन सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे लवकरात लवकर जुनी व नवीन मशीन सुरू करण्याची मागणी केली.