स्वगामी परतलेल्या युवकांना रोजगाराचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:31 AM2021-05-27T04:31:06+5:302021-05-27T04:31:06+5:30
सडक-अर्जुनी तालुक्यातील दोन ते अडीच हजाराच्या जवळपास कामगार व शेतमजूर युवक बाहेरून तालुक्यात आले आहेत. काही कुटुंब तेलंगणा राज्यातून ...
सडक-अर्जुनी तालुक्यातील दोन ते अडीच हजाराच्या जवळपास कामगार व शेतमजूर युवक बाहेरून तालुक्यात आले आहेत. काही कुटुंब तेलंगणा राज्यातून आलेत तर काही नागपूर, पुणे आदि शहरातून आले आहेत. तालुक्यातील नागरिक मुख्य: शेतीवर अवलंबून आहेत. शेतीची कामे आटोपल्यानंतर शेतमजूर युवक व शेतकरी हे रोजगारासाठी शहराकडे धाव घेतात. त्यानुसार रोजगारासाठी ते गेले होते. परंतु कोरोनामुळे तेथील रोजगार बंद झाल्याने ते गावाकडे परत आले आहेत. मात्र त्यांच्यासमोर आता रोजगार आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा आहे.
त्यांच्या हाताला काम मिळावे यासाठी एमआयडीसीची (औद्योगिक वसाहत) उभारणी आवश्यक आहे. तालुक्यात एमआयडीसीची मागणी तशी जुनीच आहे. निवडून येणारा लोकप्रतिनिधी मग तो कोणीही असो, रोजगाराचा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन देत असतो. परंतु आश्वासनाची पूर्ती होत नाही. मात्र आता खऱ्या अर्थाने एमआयडीसीची उभारणी गरजेची झाली आहे. परजिल्हा, परदेश आणि परराज्यातून परतलेल्या तरुणांच्या हाताला काम देणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया तालुक्यातून उमटत आहे.
-----------------------
अशी आहे तालुक्याची स्थिती
तालुक्यात १०९६८.८७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. ९७४०.१३ हेक्टर क्षेत्र कोरडवाहू आहे. २०४७२ हेक्टर क्षेत्र खरीप पिकाखालील आहे. ३२८२ हेक्टर क्षेत्र रब्बी पिकांखालील असून १८३९ हेक्टर क्षेत्र उन्हाळी पिकाखालील आहे. निसर्गाच्या लहरीपणावर तालुक्यातील शेती अवलंबून आहे. शेती पिकली नाही तर शेतकरी कर्जबाजारी होतो. तालुक्याच्या निर्मितीला २८ वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु शासनातर्फे अद्याप तालुक्याच्या विकासासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी मजूर इतरत्र स्थलांतरित होत असतो.