सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 12:52 AM2018-10-07T00:52:02+5:302018-10-07T00:52:54+5:30
गाव तिथे रस्ता बांधकाम होणार. शेतामध्ये जाणारा पांदण रस्ता आता पक्का व रहदारी योग्य होणार. ग्रामीण भागाचा विकास करुन घेण्यासाठी खेड्यापाड्यातील रस्त्यांचा विविध योजनांमधून कायापालट करण्यासाठी शर्तीने प्रयत्न केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : गाव तिथे रस्ता बांधकाम होणार. शेतामध्ये जाणारा पांदण रस्ता आता पक्का व रहदारी योग्य होणार. ग्रामीण भागाचा विकास करुन घेण्यासाठी खेड्यापाड्यातील रस्त्यांचा विविध योजनांमधून कायापालट करण्यासाठी शर्तीने प्रयत्न केले जात आहे.
गावागावांतील मुलभूत सोई पूर्ण करुन परिसरात गेल्या कित्येक वर्षापासूनची भेडसावणारी सिंचनाची समस्या निश्चितपणे मार्गी लागणार. एका पाण्यामुळे उत्पादन गमाविण्याची पाळी शेतकऱ्यांवर येणार नाही. ओबीसी समाजातील सर्व गरजू लाभार्थ्यांना स्वत:च्या राहत्या घराचे स्वप्न येत्या काही दिवसांत पूर्ण होण्याची ग्वाही राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजुर झालेल्या बोरटोला-इंजोरी रस्त्याच्या भूमिपूजन समारंभाप्रसंगी ते बोलत होते.जवळील ग्राम इंझोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात इंझोरी ते बोरटोला रस्त्याच्या बांधकाम भूमिपूजनाप्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर होते.
प्रमुख पाहुणे म्हणून तालुका भाजपाचे अध्यक्ष उमाकांत ढेंगे, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा रचना गहाणे, तालुका संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष रघुनाथ लांजेवार, जिल्हा भाजपा महासचिव तथा बाजार समितीचे उपसभापती लायकराम भेंडारकर, जि.प. सदस्य कमल पाऊलझगडे, डॉ. नाजुक कुंभरे, उपविभागीय अभियंता दिनेश कापगते, तहसीलदार धनंजय देशमुख, उपसरपंच दिपीका रहिले, प्रकाश शिवणकर, नेमीचंद मेश्राम, डाकराम मेंढे, विनोद नाकाडे, संदीप कापगते, शैलेष जायस्वाल, होमराज ठाकरे, पुरुषोत्तम डोये इत्यादी उपस्थित होते.नामदार बडोले यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा करुन व कुदळ मारुन इंझोरी ते बोरटोला या साडेचार किमी.
रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. पुढे बोलताना नामदार बडोले यांनी, सदर रस्त्यावर १ कोटी ६४ लाख रुपये खर्च करुन दर्जेदार रस्ता बनविला जाणार आहे. परिसरात विविध योजनेंतर्गत रस्त्यांची कामे मंजूर असून ग्रामीण भागात विकासाची नांदी घडणार. कोरडवाहू परिसर असल्याने मागेल त्याला विहिरी हा धडक प्रकल्प राबविला जात आहे. वर्ग २ च्या शेतजमिनी वर्ग १ करुन शेतकºयांना भूमिस्वामी बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
येत्या काही दिवसात सर्व ओबीसी बांधवांना घरे मिळणार. विजेचा प्रश्न निकाली लागणार. २१ हजारांची उत्पन्न मर्यादा वाढवून ४० हजार करण्यात आली. क्रीमिलिअरच्या मर्यादेत वाढ झाली असून जनतेच्या हितार्थ योजना राबविण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वनहक्क जमिनीचे पट्टे लाभार्थ्यांना देण्याची गती वाढत असल्याचेही त्यांनी सांगीतले.
यावेळी शिवणकर व गहाणे यांनी मार्गदर्शन करुन स्वातंत्र्यापासून जी कामे रेंगाळली होती ती कामे भाजपा सरकारने पूर्ण केली. वंचित व सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम सरकार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. भेंडारकर यांनी, परिसरातील विविध प्रश्न मार्गी लावण्याची मागणी यावेळी केली.
कार्यक्रमाला परिसरातील नागरिक उपस्थित होते. विभागाचे दिनेश कापगते, अजित ठवरे यांनी आयोजनासाठी सहकार्य केले.