पिपराच्या तीन लक्ष रोपवाटिकेतील मातीवर प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 09:33 PM2019-03-04T21:33:38+5:302019-03-04T21:34:07+5:30
तुमसर तालुक्यातील पिपरा गावाशेजारील नाल्याजवळ तीन लक्ष वृक्षांची रोपवाटिका तयार करण्याचे काम जानेवारी महिन्यापासून सुरू आहे. सामाजिक वनीकरण विभाग ही रोपवाटिका तयार करीत आहे. ४ लक्ष ३६ हजार ९६६ रुपये येथे खर्च केला जात आहे.
मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर तालुक्यातील पिपरा गावाशेजारील नाल्याजवळ तीन लक्ष वृक्षांची रोपवाटिका तयार करण्याचे काम जानेवारी महिन्यापासून सुरू आहे. सामाजिक वनीकरण विभाग ही रोपवाटिका तयार करीत आहे. ४ लक्ष ३६ हजार ९६६ रुपये येथे खर्च केला जात आहे. संकरीत बीज येथे उपयोगात आणले जात असून नाल्याशेजारील एका शेतातून माती येथे आणण्यात आली असे सांगण्यात येत असले तरी रोपवाटिकेपासून हाकेच्या अंतरावर नाला खोदकामातील मातीचा उपयोग केल्याचे दिसून येते.
एकच लक्ष्य ३३ कोटी वृक्ष असे घोषवाक्य राज्य शासनाच्या वनविभागाचे आहे. गाव, ओसाड, जमीन, रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावणे, जंगल हिरवेगार करणे आादी ठिकाणी वृक्ष लागवडीचा धडाकेबाज कार्यक्रम मागील तीन वर्षापासून सुरु आहे. तुमसर तालुक्यातील तुमसर शहरापासून तीन किमी अंतरावर पिपरा गावाजवळील नाल्याशेजारी रोपवाटिका तयार करण्यात येत आहे. तीन लाख वृक्ष पिशवीत बीज घालून तयार करण्याची कामे जानेवारी महिन्यात सुरु करण्यात आली. प्लास्टीक काळ्या पिशवीत येथे बीज घालून वृक्ष लागवड करण्यात येत आहे. निम्म्यापेक्षा जास्त कामे येथे झाली आहेत. राज्याच्या वनविभागाने २०१९ करिता १३ कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय निश्चित केले आहे. रोपवाटिकेकरिता गाळाची माती, खत व वाळूमिश्रीत माती वापरात येत आहे. सदर प्लास्टीक पिशवीतील माती ही नाल्या शेजारीत एका शेत जमिनीतून आणली जात असल्याची माहिती आहे, परंतु नाल्याच्या काठ पोखरल्याच्या खुणा येथे दिसतात. नाला येथे पोखरला आहे. तो कुणी पोखरला हा मोठा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. रोपवाटीका तयार होत असलेली जागा ही शासकीय आहे. महसूल प्रशासनाच्या अधिकारातील ही जागा असून महसूल प्रशासनाची परवानगी येथे घेतली काय? असा प्रश्न आहे. सदर रोपवाटिका किमान दोन एकर परिसरात तयार होत आहे. यात आंबा, बदाम, कडुनिंब, आवळा, सिसम या वृक्षांचा येथे समावेश आहे. प्लास्टीक भरताना २:१:१ या नियमाने पिशवी भरण्याचा नियम आहे. गाळाची माती ५०० रुपये, शेणखत एक हजार रुपये प्रती घनमीटर, याप्रमाणे खर्चाची रक्कम सुचविण्यात आली आहे. लाखो रुपयांचा खर्च येथे सध्या केला जात आहे. किमान वृक्ष जगणे आवश्यक आहे.
पिपरा येथील रोप निर्मितीकरिता लागणाऱ्या मातीकरिता कंत्राट दिले होते. त्यांनी माती कुठून आणली याबाबत माहिती नाही. माती दर्जात्मक असावी असे त्यांना सांगण्यात आले होते. ग्रामस्थांकडून पाणी, जागेची नाहरकत घेतली आहे. रोपनिर्मिती जागेजवळील नाल्याचे पूर्वीच खोदकाम झाले होते. निविदेच्या माध्यमातून मातीचे कंत्राट देण्यात आले आहे.
-आकांक्षा भालेकर, वनपरिक्षेत्राधिकारी, सामाजिक वनीकरण, तुमसर.