लसीकरणासाठी ४५पेक्षा वयोगटाच्या रांगा, तरुणांची नोंदणी करूनही पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:29 AM2021-05-13T04:29:43+5:302021-05-13T04:29:43+5:30
गोंदिया : कोरोनाचा संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरणावर सध्या भर दिला जात आहे. जिल्ह्यात १ मे पासून पाच केंद्रावर ...
गोंदिया : कोरोनाचा संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरणावर सध्या भर दिला जात आहे. जिल्ह्यात १ मे पासून पाच केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण सुरू करण्यात आले. त्यानंतर डोस उपलब्ध झाल्यानंतर शहरी व ग्रामीण भागातील ९० हून अधिक केंद्रांवरून लसीकरण करण्यात आले. लसीकरण मोहिमेला ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील नागरिकांच्या रांगा लागत असताना दुसरीकडे अनेक तरुण लसीकरणासाठी नोंदणी करून केंद्रावर न पोहोचल्याने १८७ डोस वाया गेल्याचे चित्र आहे.
१ मे पासून १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना लसीकरणाला सुरुवात झाली. पहिले दोन-तीन दिवस तरुणांनी लसीकरणासाठी मोठा उत्साह दाखवित लसीकरण केंद्रावर गर्दी केली होती. मात्र त्यानंतर लसीकरणासाठी ॲपवर नोंदणी करूनदेखील केंद्रावर न पोहोचल्याने बऱ्याच प्रमाणात डोस वाया गेल्याचे केंद्रावरील आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यासाठी १४० केंद्रावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. प्रतिबंधात्मक लस घेण्यात ४५ वर्षांवरील आणि ज्येष्ठ नागरिक अग्रेसर आहेत. आतापर्यंत १ लाख ४० हजारांवर नागरिकांनी प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. ४५ वर्षांवरील नागरिक लसीकरण केंद्रासमोरील रांगेत दोन-तीन तास उभे राहून लस घेत आहेत. तर दुसरीकडे युवक लसीकरणासाठी नोंदणी करूनसुध्दा केंद्रावर पोहोचत नसल्याने मोठ्या प्रमाणात डोस वाया जात आहेत.
.................
सकाळी ८ वाजतापासूनच
येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बीजीडब्ल्यू रुग्णालयात सकाळी ९ वाजतापासून लसीकरणाला प्रारंभ केला जात आहे. मात्र सकाळच्या वेळ उन्हे कमी राहत असल्याने सकाळीच जाऊन लसीकरण घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची लगबग असते. त्यामुळे ते सकाळी ८ वाजताच रुग्णालयात पोहोचत लसीकरणासाठी रांगेत लागत असल्याचे चित्र सध्या गोंदिया येथे पाहायला मिळत आहे.
.......
दुसऱ्या डोससाठी केटीएस येथील केंद्रावर गर्दी
गोंदिया शहरातील नागरिकांसाठी शहरात तीन ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र सर्वाधिक गर्दी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर दिसून येत आहे. ४५ वर्षांवरील नागरिक येथे सकाळी ८ वाजतापासूनच लसीकरणासाठी गर्दी करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या केंद्रावर दररोज तीनशेच्या जवळपास नागरिकांचे लसीकरण केले जात आहे.
.................
केवळ दहाच दिवस चालली मोहीम
- १ मे पासून जिल्ह्यातील पाच केंद्रांवरून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली. मात्र ही मोहीम १२ मे पासून बंद करण्यात आली. केवळ दहाच दिवस या वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यात आले. त्यामुळे डोस वाया जाण्याची संख्या फार नव्हती.
- युवकांचा उत्साह मावळला, शासनाने दुसऱ्या डोसला प्राधान्य देत १२ मे पासून या वयोगटातील नागरिकांना लसीकरण करणे बंद केले. त्यामुळे युवकांमध्ये नाराजीचा सूर होता. बऱ्याच युवकांनी यासाठी नोंदणीसुध्दा करून ठेवली होती. मात्र आता त्यांची निराशा झाली आहे.
............
दररोज जिल्ह्याला मिळतात : ७०० डोस
१८ ते ४४ वयोगटासाठी : २०० हजार डोस
४५ वर्षांवरील वयोगटासाठी : ५०० हजार डोस
..............