बालकांच्या व्यंगत्वावर मात करण्यासाठी ‘शीघ्र हस्तक्षेप केंद्र’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 06:00 AM2019-11-24T06:00:00+5:302019-11-24T06:00:23+5:30
आदिवासी व नक्षलदृट्या अतिसंवेदनशिल असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आरोग्यासंदर्भात लोक उदासिन आहेत. त्यात महिला गर्भवती असतांना त्यांच्या आहाराकडे व आजाराकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अनेक बालकांची गर्भात वाढ होत नाही. अनेक बालके व्यंगत्व घेऊन जन्माला येतात. त्यांना उभ्या आयुष्यात जगतांना अडचण येऊ नये, कुणी हिनवू नये यासाठी त्यांच्या संपूर्ण यशस्वी उपचारासाठी शासनाने ‘जिल्हा शिघ्र हस्तक्षेप केंद्र’ उभारले आहे.
नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जन्मत:च व्यंगत्व किंवा जन्मानंतर शरीरात आलेल्या व्याधींवर मात करण्यासाठी शासनाने जिल्हा सामान्य रूग्णालयात‘जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र’ सुरू केले आहे. एप्रिल २०१९ पासून गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या या शिघ्र हस्तक्षेप केंद्राचा लाभ १ हजार ११५ बालकांना झाला आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने त्या बालकांवर उपचार केला जात आहे.
आदिवासी व नक्षलदृट्या अतिसंवेदनशिल असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आरोग्यासंदर्भात लोक उदासिन आहेत. त्यात महिला गर्भवती असतांना त्यांच्या आहाराकडे व आजाराकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अनेक बालकांची गर्भात वाढ होत नाही. अनेक बालके व्यंगत्व घेऊन जन्माला येतात. त्यांना उभ्या आयुष्यात जगतांना अडचण येऊ नये, कुणी हिनवू नये यासाठी त्यांच्या संपूर्ण यशस्वी उपचारासाठी शासनाने ‘जिल्हा शिघ्र हस्तक्षेप केंद्र’ उभारले आहे. ह्या केंद्राच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यातील व्यंगत्व असलेले किंवा जीवन जगत असतांना आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी या जिल्हा शिघ्र हस्तक्षेप केंद्राची मदत मिळत आहे.
एप्रिल २०१९ पासून सुरू झालेल्या या केंद्रामार्फत गोंदिया जिल्ह्यातील १ हजार ११५ बालकांवर यशस्वी उपचार करण्यात आला. ० ते १८ वर्ष वयोगटातील बालकांना जन्मत: असणारे आजार, जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारे आजार, बालपणातील आजार, शारीरिक व बौध्दीक विकासात्मक वाढीतील होणारे आजार यांच्यावर विनामुल्य तपासण्या व त्यांचा संपूर्ण उपचार मोफत करण्यात येते.
जीवनसत्वाच्या अभावामुळे उदभवणारे रक्तक्षय अॅनिमिया, रातांधळेपणा, कुपोषण व मुडदूस अशा आजारांचे उपचार केले जाते. या केंद्रात बालकांवर उपचार करण्यासाठी किंवा त्यांना योग्य सल्ला देण्यासाठी बालरोग विशेषतज्ज्ञ डॉ. प्रदीप गुजर, वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. कृष्णकुमार त्रिपाठी, व्यवस्थापक म्हणून पारस लोणारे व त्यांच्या मदतीला काही डॉक्टर व कर्मचारी आहेत.
बालपणातील आजार,शारीरीक व बौध्दीक विकासात्मक वाढीसाठी येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी डीईआयसी कार्यक्रम घेण्यात येत आहे.
या आजारांवर होणार उपचार
जन्मत:च असणाऱ्या व्यंगत्व यात न्युरल ट्यूब डिफेक्ट, डाऊन सिन्ड्रोम, फाटलेले ओठ, टाळू, वाकडे पाय, डेव्हलपमेंट डिसप्लाझीया ऑफ हिप, जन्मत:च असणारा मोतिया बिंदु, जन्मत: असणारा बहिरेपणा, जन्मत:च असणारा हृदयरोग, रेटावनोपॅथी ऑफ प्रिमेच्युरिटी, जन्मत: असणारा तिरळेपणा, त्वचेचे आजार, कान फुटने, हृदयाचे आजार, श्वसनाचे आजार, दात किडणे, झटके येणे, हायपोथाईरॉडीझम, सिकलसेल अॅनिमीया, बिटा थॅलेसिमीया, रक्तक्षय अॅनिमिया, रातांधळेपणा, कुपोषण व मुडदूस अशा आजारांचे उपचार केले जाते.